कल्याण : कर्ज फेडण्यासाठी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंधाराचा फायदा घेत दीड लाखाचे मंगळसूत्र घेऊन चोराने पळ काढला. पण महिलेने आरडाओरडा केल्याने स्टेशनवर ग्रस्त घालत असलेल्या कल्याण लोहमार्ग पोलिसांनी चोराला पकडले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कर्जबाजारी झाल्याने चोरीचा रस्ता निवडत भिवंडीमधून कल्याण स्टेशनवर चोरी करण्यासाठी आला, अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रोशन नथू पाटील असे आरोपीचे नाव आहे.
भिवंडीच्या दौडा वडवली परिसरात राहणारा 29 वर्षीय रोशन हा कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे कर्जमुक्त होण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला. यासाठी भिवंडीवरून त्याने कल्याण स्टेशन गाठले. रात्री अंधारात स्टेशनची पूर्ण पाहणी करून अंधार असलेल्या जिन्यावर तो सोनं घालून येणाऱ्या महिलेची वाट पाहू लागला. रात्री तीनच्या दरम्यान त्याला एक महिला मोठा सोन्याचा हार घालून येताना दिसली. मग काय आरोपीने अंधाराचा फायदा घेत तिच्या गळ्यातील सोन्यावर आपला हात साफ केला. हार खेचत त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी महिलेने मोठमोठ्याने आरडाओरडा करत चोरट्याचा पाठलाग सुरू केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून स्टेशन परिसरात तैनात असलेल्या कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आणि कल्याण रेल्वे पोलिसांनी लगेचच आरोपीच्या दिशेने धावत आरोपीचा पाठलाग केला. अखेर पोलिसांनी झडप घालत त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आढळले. सध्या या आरोपीवर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीसोबत अजून कोण कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.