Kalyan Crime : गर्दीचा फायदा घेत करायचे हात साफ, प्रवाशांचे मोबाईल चोरणारी दुक्कल गजाआड
गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करणारे, खिसा कापणारे अनेक भुरटे चोर आजूबाजूला फिरत असतात. त्यामुळे आपलं सामान सांभाळून ठेवण्याची घोषणाही बऱ्याच वेळा रेल्वे स्टेशनवर करण्यात येते.अशाच गर्दीचा फायदा प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दुकलीला पोलिसांनी गजाआड केले.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 18 ऑक्टोबर 2023 : रेल्वे स्टेशनवर गर्दी (rush on staion) खूप असली की जरा सावधच रहावं लागतं. कारण गर्दीचा फायदा घेऊन हात साफ करणारे, खिसा कापणारे अनेक भुरटे चोर आजूबाजूला फिरत असतात. त्यामुळे आपलं सामान सांभाळून ठेवण्याची घोषणाही बऱ्याच वेळा रेल्वे स्टेशनवर करण्यात येत असते. अशाच गर्दीचा फायदा प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दुकलीला कल्याण जीआरपी पोलिसांनी गजाआड केले. त्यांनी 9 गुन्ह्यांची उकल करत तब्बल 17 मोबाईल (seized mobiles) जप्त केल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलिसांनी केली कारवाई
रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातले मोबाईल हातचलाखीने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात . अशोक गायकवाड व नरेश गायकवाड अशी या दोन सराईत चोरट्यांची नावे असून कल्याण रेल्वे जीआरपी पोलिसांनी त्यांना अटक केली. तसेच पोलिसांनी नऊ गुन्ह्यांची उकल करत या दोन्ही चोरट्यांकडून चोरलेले तब्बल 17 मोबाईल हस्तगत केले. याप्रकरणी पोलीसांकडून अधिक तपास सुरू आहे.
कल्याण ,डोंबिवली सह उपनगरातील गर्दीच्या स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसतात. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत हे चोरटे प्रवाशांच्या खिशातील पर्स व मोबाईल चोरताना दिसतात. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवूनही फायदा झाला नव्हता. 14 ऑक्टोबर रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात अशीच एक मोबाईल चोरीच तक्रार दाखल झाली होती. स्टेशनवर मोबाईल चोरीला गेल्याचे पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले होते.
त्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. अखेर मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अंबरनाथ येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अशोक गायकवाड व नरेश गायकवाड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत . कल्याण रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत नऊ गुन्ह्यांची उकल केली असून तब्बल 17 मोबाईल या चोरट्यांकडून हस्तगत केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.