Dombivli Crime : रत्नागिरीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून डोंबिवलीत लपलेल्या आरोपी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गेल्या 9महिन्यांपासून डोंबिवलीत लपणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. कल्याण क्राईम क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी त्याला बेड्या ठोकल्या.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, डोंबिवली | 20 ऑक्टोबर 2023 : आपण जे चांगलं- वाईट काम करतो, त्याचा सगळ्याचा हिशोब इथेच, या जन्मात फेडून जावा लागतो. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एखादी छोटीशी चूक करतोच, ज्यामुळे कधी-ना-कधी त्याचा गुन्हा उघडकीस येतोच आणि त्या गुन्ह्याची शिक्षाही भोगावी लागतेच. असाच एक प्रकार डोंबिवलीतही घडला आहे. डोंबिवलीतून (dombivli) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रत्नागिरीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर पोलिसांच्या भीतीने गेल्या 9 महिन्यांपासून डोंबिवलीत लपलेल्या एका नराधमाला (accused arrested) अटक करण्यात आली.
कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर त्यांनी या आरोपीला रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रेम शिंदे असे या आरोपीचे नाव असून याप्रकरणी आधी आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यासंदर्भात संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
भीषण कट रचून दोघांनी केला अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली. तेथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. दोघा जणांनी हे दुष्कृत्य केले. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला. यासदंर्भात तपास करत असताना पोलिसांनी तपास करत या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली. सुमीत संजय लोथ असे त्याचे नाव असून संगमेश्वर येथूनच ताब्यात घेण्यात आले.
मात्र सुमितला अटक झाल्यानंतर त्याचा साथीदार, आरोपी प्रेम शिंदे हा फरार झाला. या घटनेला तब्बल ९ महिन्यांचा काळ उलटून गेला. पोलिस प्रेम शिंदे याचा सर्वत शोध घेत होते, मात्र तो कुठेच सापडत नव्हता. अखेर आरोपी प्रेम हा डोंबिवली जवळच्या उंबार्ली गावातील एका चाळीतील राहत असल्याची माहिती खबऱ्यांकडून कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली.
त्यानंतर गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, मा.सहा. पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, पो.हवा. अनुप कामत, विश्वास माने, बापूराव जाधव, पो.ना. सचिन वानखेडे, पो.कॉ. विनोद चन्ने, पो. कॉ. विजेंद्र नवसारे यांनी उंबार्ली गावात सापळा रचला. आणि फरार आरोपी प्रेम एकनाथ शिंदे याला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला संगमेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.