सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 7 नोव्हेंबर 2023 : गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. कल्याण शहरातील एका घरात त्या मुलीचा मृतदेह सापडला असून नातेवाईकांनीच तिला गायब करत तिचे लग्न जबरदस्तीने लग्न लावून दिले. आणि तिला सातत्याने ब्लॅकमेल करत तिची हत्या केल्याचा आरोप करत आरपीआय कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर आरपीआय कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी तिच्या नवऱ्याला काळं फासत चांगलाच चोप दिला.
या घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी इतर संतप्त कार्यकर्त्यांच्या तावडीतून त्या तरूणाची सुटका करत पुढील तपास सुरू केला आहे
नेमकं काय झालं ?
मिळालेल्या माहिती नुसार पुणे येथील निगडी परिसरात राहणारे राजेंद्र रणदिवे यांची अल्पवयीन मुलगी अडीच महिन्यापूर्वी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. त्या मुलीला तिच्याच एका नातेवाईकाने फूस लावून कल्याण मध्ये आणले आणि तेथील गाळेगाव परिसरात राहणाऱ्या रोहन काळे नावाच्या मुलासोबत तिचे लग्न लावून दिले, अशी माहिती तिच्या वडिलांना मिळाली होती. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्या मुलीने तिच्या वडिलांना फोन केला होता.बाबा मला प्लीज घरी न्या, इथे हे लोक मला ब्लॅकमेल करत आहेत, मारहाणही होत्ये, असे सांगत त्या मुलीने वडिलांना पुन्हापुन्हा घरी नेण्याची विनंती केली.
मुलीला होणार त्रास कळताच तिच्या वडिलांच्या मनात कालवाकालव झाली आणि त्यांनी तिला नेण्यासाठी तयारी सुरू केली. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक फोन आला, त्यावरून कळलेली बातमी ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या लाडक्या लेकीने आत्महत्या केली असा निरोप त्यांना मुलीच्या सासूकडून मिळाला. मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रणदिवे हे कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी आरपीआय कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. या मुलीचे अपहरण करून तिला जबरदस्ती घरात कोंडून ठेवले. तसेच तिचे जबरदस्तीने लग्न लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला, असा आरोप करत त्या कार्यकर्त्यांनी तिचा नवरा रोहन आणि इतर नातेवाईकांना थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच त्यांच्या तोंडाला काळंही फासलं.
मात्र या घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनमधील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांच्या तावडीतून त्या मुलाची सुटका करत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नातेवाईकांनी जो आरोप केला आहे, त्या आधारे तपास केला जाईल. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्या अहवालात काय येते, यावरूनही काही गोष्ट स्पष्ट होतील. ती मुलगी अल्पवयीन होती. त्यामुळे हा प्रकार गंभीर आहे. त्याचा तपास आम्ही करीत आहोत असे पोलिसांनी सांगितले.