Kalyan Crime : नाम बडे और… महागड्या कारमधून येणारे ते असं काम करायचे, पोलिसही झाले अवाक
कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी तीन आरोपींना मुंब्रा परिसरातून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी तीन गुन्हे उघडकीस आणत या आरोपीकडून साडेसात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 10 ऑक्टोबर 2023 : नाम बडे और दर्शन छोटे… काही काही लोकांबाबत ही म्हण अगदी खरी होते. याच म्हणीचा प्रत्यय देणारी एक अजब पण तितकीच धक्कादायक घटना कल्याण परिसरात (kalyan crime) घडली आहे. महागड्या गाडीमधून येणारे तरूण दुकान फोडून त्यातील लाखोंचा माल पळवून फरार व्हायचे असे उघडकीस आले आहे. एका दुकानामध्ये झालेल्या चोरीचा तपास करताना या गुन्हेगारांचे इतरही गुन्हे उघडकीस आले.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळत त्यांना अटक केली. नौशाद खान, मुसीब खान व सलमान खान अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपासही करण्यात येत आहे.
असा उघड झाला गुन्हा
कल्याण कोळसेवाडी परिसरात चक्की नाका येथे बॅटरीचे दुकान फोडून लाखो रुपयांच्या बॅटरी लंपास करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर कल्याण कोळशेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे व कोळशेवाडी पोलीस तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने ज्या दुकानात चोरी झाली तेथील व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
याच दरम्यान कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे पीएसआय रविराज मदने, एपीआय पगारे एस आय शिर्के, पोलीस हवालदार शांताराम सागळे, सुरेश जाधव, गावित , सगळे ,सोनवणे, हांडे, दळवी भांबरे, कदम , घुगे , यांनीही सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा मुंब्रा डोंगरी परिसरात हे गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानतंर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचत या तिन्ही आरोपींना 24 तासांच्या आत बेड्या ठोकत अटक केली.
पोलिसांनी या तीनही आरोपींकडून 15 लाखापेक्षा अधिक रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात मुंबईसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी अशाप्रकारे किती ठिकाणी चोरी केली याचा तपास कल्याण कोळसेवाडी पोलीस करत आहेत