Kalyan Crime : बस स्थानकात पाकीटमारांचा सुळसुळाट, ब्लेडने खिसे कापून पैसे लंपास , एकाला अटक
शहरात सध्या सर्वत्र पाकिटमारांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक भलतेच त्रासले असून अनेकांना त्यांचा फटका बसला आहे. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी कारवाई केली.
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 20 ऑक्टोबर 2023 : कल्याण-डोंबिवलीमध्ये सध्या गुन्हेगारांचे साम्राज्य पसरले आहे. दरदिवशी गुन्ह्यांच्या काही ना काही घटना उघडकीस येत आहेत. कधी मध्यरात्री दुकान फोडून चोरी करत लाखोंचा माल पळवला जातो तर कधी भररस्त्यात नागरिकांवर हल्ला करून त्यांच्याकडूल दागिने, पैसे लुटले जातात. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनस्तापात भर पडली असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
तसेच शहरात गेल्या काही दिवसात पाकिटमार, खिसेकापू यांचाही उपद्रव वाढला आहे. बसस्थानक परिसरात पाकीटमारांचा सुळसुळाट असून बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खिसा ब्लेडने कापून पाकीट , पैसे आणि मौल्यवान वस्तू लंपास करत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. याप्रकरणी चोरांना आळा घालण्यासाठी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत एका सराईत चोराला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं ?
कल्याण बस स्टँडवरून बसचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खिसे कापत पैसे व पर्स चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कल्याण महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचत स्टेशन आरोपीला अटक केली. महात्मा प्रसाद हरिप्रसाद सिंह असे या आरोपीचे नाव असून कल्याण महात्मा फुले पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल ही हस्तगत केला आहे.
कल्याण स्टेशन आणि बस स्टॉप परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. प्रवासी नागरिकांचे खिसे कापून त्यांचे पाकीट, पैसे तसेच मौल्यवान वस्तू लांबवण्यात आल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. 16 ऑक्टोबर रोजी अशीच एक धक्कादायक घटना घडली. भिवंडीत राहणारे अन्सारी नदीम आयुब हे (वय 36) दुपारी भिवंडी ते कल्याण असा बसने प्रवास करत होते. कल्याण बस स्थानकात ते उतरत असताना अज्ञात आरोपीने त्यांचा खिसा कापून जवळपास ३० हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली होती.
याप्रकरणी पीडित इसमाच्या फिर्यादीनंतर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर झोन तीनचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याण घेटे, पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलिस निरिक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरू करण्यात आला. कल्याण बस स्टेशन आणि त्याच्या आसपासच्या परिसराती सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. त्याआधारे कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पीएसआय वाघ व भिसे, जितू चौधरी , गामने ,चित्ते सह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी स्टेशन परिसरात सापळा रचला आणि खिसे कापणारा आरोपी महात्मा प्रसाद हरिप्रसाद सिंह ( वय ५३, रा. डोंबिवली) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याने आत्तापर्यंत अशाप्रकारे किती गुन्हे केले आहेत याचा तपास आता महात्मा फुले पोलीस करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.