फलाटावरील डुलकी महागात पडली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
रेल्वे स्थानकात डुलकी घेणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले आहे. पापण्या मिटताच चोरटा तात्काळ सक्रिय झाला आणि प्रवाशाला लुटून पसार झाला.
कल्याण : लोकलची वाट पाहत फलाटावर बसलेल्या प्रवाशाला एक डुलकी महागात पडली आहे. प्रवाशाचे डोळे मिटताच चोरटा सक्रिय झाला अन् प्रवाशाच्या सोन्याच्या चैनसह मोबाईल घेऊन चोरटा पळून गेला. ही सर्व घटना प्लॉटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली. शहाड रेल्वे स्थानकात ही धक्कादायक घटना घडली. सुनिल सोनावणे असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. चोरट्याने याआधी असे किती गुन्हे केले आहेत, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. आरोपी कॅटरिंगचे काम करतो. तसेच आरोपी स्वतःला पत्रकार असल्याचे सांगायचा. त्याच्याकडे पत्रकाराचे ओळखपत्रही सापडले.
शहाड रेल्वे स्थानकात घडली घटना
कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील शहाड रेल्वे स्थानकात गिरीश पडवळ नामक प्रवासी टिटवाळा लोकलची वाट पाहत बसला होता. यावेळी फलाटावर बसला असताना त्याला डुलकी लागली. प्रवाशाची डुलकी पाहून संधीच्या शोधात असलेल्या चोरट्याने या प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल अलगद काढून पळ काढला. गिरीश पडवळ यांनी कल्याणच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरटा अटक
प्रवाशाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. चोरटा टिटवाळ्यातील रहिवासी आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अभिजीत जगताप यांनी या प्रकरणाचा तपास केला. सुरक्षा बलाचे पथकही चोरट्याचा शोध घेत होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासात आरोपीला पोलिसांनी शोधून काढले. त्यानेच ही चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.