Kalyan : मृत्यूनंतरही यातना संपेनात ! आधी जिवलग मित्राने संपवले, नंतर… कल्याणमध्ये नेमकं काय घडलं ?
कल्याण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पार्टीत किरकोळ वादातून आधी एका तरूणाची त्याच्याच जीवलग मित्राने हत्या केली. मात्र मृत्यूनंतरही त्याच्या यातना संपल्या नाहीत. कारण पोलिस स्टेशनच्या हद्दीचा वाद निर्माण झाल्याने...
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 25 जानेवारी 2024 : कल्याण शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पार्टीत किरकोळ वादातून आधी एका तरूणाची त्याच्याच जीवलग मित्राने हत्या केली. मात्र मृत्यूनंतरही त्याच्या यातना संपल्या नाहीत. कारण पोलिस स्टेशनच्या हद्दीचा वाद निर्माण झाल्याने त्याचा मृतदेह 10 तास हॉस्पिटलबाहेर तसाच पडून होता. हे कमी की काय म्हणून पोस्टमॉर्टमसाठी तज्ञ डॉक्टर नसल्याने आणखी 12 तास तो पंख्याखाली तसाच ठेवण्यात आला. यामुळे शोकाकुल मृताच्या नातेवाईकांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजिद सय्यद असं मृत तरूणाचं नाव असून परेश शिलकर असं आरोपीचं नाव आहे. मानपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान रखडलेल्या पोस्ट मॉर्टमसाठी डॉक्टर आणि पोलिसांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आल्यानंतर हा मृतदेह दुपारी जे जे रुग्णालयात धाडण्यात आला.
सेलिब्रेशनसाठी पार्टी केली , तीच जीवावर बेतली
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मलंग रोड परिसरात राहणारा परेश शिलकर आणि वाजिद सय्यद हे दोघे मित्र होते. ते दोघेही दोघेही पार्टनरशिपमध्ये चायनीजची गाडी सुरु करणार होते. त्यासाठी त्यांनी सर्व तयारी देखील केली होती. काही दिवसातच त्यांचं चायनीज सेंटर सुरू होणार होतं. मात्र हे काम सुरू करण्यापूर्वी त्या दोघांनी चायनीजच्या हात गाडीचा काम सुरू केलं. अर्ध काम झाल्यानंतर नवीन व्यवसायाची सेलिब्रेशन पार्टी करण्यासाठी ते कल्याण पूर्व येथील अडवली परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये गेले. मात्र पार्टी दरम्यान त्या दोघांमध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाला आणि बघता बघता तो खूप वाढला.
रागाच्या भरात परेशने वाजिद सय्यदवर चाकूने हल्ला केला. तो वार एवढा गंभीर होता की त्यात वाजिदचा जागीच मृत्यू झाला . धक्कादायक म्हणजे हल्ला केल्यानंतर परेशनेच कंट्रोल रूमला फोन करून या घटनेची माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला ताब्यात घेतले.
मृत्यूनंतरही यातना संपेना
मात्र मृत्यूनंतरही वाजिदच्या यातना काही संपल्या नाहीत. कारण त्यानंतर मानपाडा पोलीस आणि कोळसेवाडी पोलिसात हद्दीचा वाद निर्माण झाल्याने आधी त्याचा मृतदेह 10 तास हॉस्पिटल बाहेर पडून होता. नंतर पोस्टमॉर्टमाठी तज्ञ डॉक्टर नसल्याने तो 12 तास पंख्याखाली उघडा ठेवण्यात आला. अखेर त्याच्या नातेवाईकांचा संयम संपला, आणि त्यांनी गोंधळ घातला. दरम्यान रखडलेल्या शव विच्छेदनासाठी डॉक्टर आणि पोलिसांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आल्यानंतर हा मृतदेह दुपारी जे जे रुग्णालयात धाडण्यात आला. याप्रकरणी बोलताना पोलिसांनी या घटनेतील आरोपीला रात्रीच अटक केली असून आपल्याकडून विलंब झाला नसल्याचे सांगितले आहे. मात्र रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तम टिके यांनी मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला असला तरी 12 तासानंतर पोलिसांकडून पंचनामा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र पालिकेकडे फॉरेन्सिक प्रयोगशाळा नसल्याने मृतदेह जे जे रुग्णालयात धाडल्याचे सांगितले.