Kalyan Crime : कानून के हात बहुत लंबे… नेहमी जागा बदलत चकमा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड आरोपीला पोलिसांनी अखेर पकडलं कसं ?
मारहाण , फसवणूक, चोरी ,चेन स्नॅचींग , मोटारसायकल चोरी अशा ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. नेहमी जागा बदलत असल्याने त्याला पकडणं खचितच सोपं नव्हतं.
कल्याण | 14 सप्टेंबर 2023 : कानून के हात बहुत लंबे होते है… असं म्हणतात, की गुन्हेगार कितीही डोकेबाज असला तरी कायद्याच्या रक्षकांच्या हातात कधी ना कधी सापडतोच. याचीच प्रचिती देणारी एक घटना कल्याणमध्ये घडली आहे. दहा गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेल्या (most wanted) आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जाफरी उर्फ अफ्रीदी इराणी याला कल्याण खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर 30 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून १० गुन्ह्यांमध्ये तो मोस्ट वॉन्टेड होता. अखेर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आणि त्याला अटक केली.
जाफरी या २४ वर्षीय आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. सकीय अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना मारहाण करणे, फसवणूक, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग तसेच मोटारसायकलची चोरी करणे, असे 30 पेक्षा अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यापैकी १० गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड होता. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र सराईत गुन्हेगार असणारा अफ्रीदी इराणी हा नेहमी जाग बदलून रहात असल्याने त्याचा ठावठिकाणा शोधणं सोपं नव्हतं. त्यामुळेच त्याचा माग काढणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं. पण खबरींच्या मदतीने खडकपाडा पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाणे , मुंबई , नवी मुंबई सह इतर जिल्ह्यात चेन स्नॅचींग, लूटमार-चोरी यासह वाहन चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्तासह इतर पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात काम करत असून शोधमोहिम राबवली जात होती. या शोध मोहिमे दरम्यान कल्याण खडकपाडा पोलिसांना माहिती मिळाली की पोलिसांना मारहाण करणारा 24 वर्षीय जाफरी उर्फ अफ्रीदी हा आरोपी अंबिवली परिसरात लपला आहे. खबरींकडून मिळालेल्या या माहितीनंतर कल्याण खडकपाडा पोलिसांनी आंबिवली परिसरात सापळा रचत या आरोपीला बेड्या ठोकल्या.