मोलकरणीनेच मालकिणीचे दागिने चोरले, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलेली शक्कल पाहून तुम्हीही चकित व्हाल !
मोलकरणीनेच मालकिणीचे सात लाखांचे दागिने चोरल्याची घटना कांदिवलीत उघडकीस आली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक केली आहे.
मुंबई / गोविंद ठाकूर : मालकिणीचे दागिने चोरुन फरार झालेल्या मोलकरणीला पकडण्यास कांदिवली पोलिसांना यश आले आहे. दीपिका संतोष पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मोलकरणीचे नाव आहे. या मोलकरणीने याआधीही अशी चोरी कुठे केली आहे का याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. आरोपी महिला चार महिन्यांपूर्वीच मोलकरीण म्हणून कामाला लागली होती. याप्रकरणी घर मालकीण अनुजा जयेश मोदी यांच्या तक्रारीनुसार कांदिवली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार महिन्यांपूर्वी मोलकरणीला कामावर ठेवले होते
अनुजा मोदी आणि त्यांचे पती दोघे घरात राहतात. दोघेही नोकरी करतात. त्यांनी 4 महिन्यांपूर्वीच दीपिका पवार या महिलेला घरात कामासाठी ठेवली होती. मोदी दाम्पत्य कामाला गेल्यानंतर मोलकरीण घरी एकटीच असायची. यानंतर संधी साधत मोलकरणीने मालकीचे दागिने लंपास केले.
मालकिणीचे 2 डायमंडचे मंगळसूत्र, 7 अंगठ्या, 3 पिवळया धातूचे पेंडंट, 1 डायमंड पेंडंट, 1 पिवळया धातूची पेंडंट चैन, कानातील 4 जोडी बुट्टी, रुद्राक्ष माळ आणि एक मोत्याची कानातील बुट्टी असा एकूण 7 लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज महिलेने चोरुन नेला.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची शक्कल
घरातील दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच मालकिणीने कांदिवली पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मोलकरणीला पकडण्यासाठी एक शक्कल लढवली. आरोपी महिलेला चोरीचे प्रकरण मालकिणीच्या लक्षात आल्याचे भासवू न देता मोलकरणीला कामावर बोलावण्यास सांगितले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे मालकिणीने नेहमीप्रमाणे मोलकरणीला कामावर बोलावले.
आरोपी मोलकरणीन अटक
मोलकरणीही बेसावध असल्याने तात्काळ कामावर हजर झाली. ती कामावर येताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. यानंतर मोलकरणीला पोलीस ठाण्यात आणून तिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी महिलेकडून चोरुन नेलेला मुद्देमालही हस्तगत केला आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.