‘सुपारीसाठी संपर्क करा’, व्हायरल पोस्टने पोलिसांची झोपच उडाली
रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टाने पोलिस खातं चांगलचं हादरलं. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत ती पोस्ट टाकणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटचा शोध घेतल्यावर जे सत्य समोर आलं ते पाहून तर...
मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : सोशल मीडियाचा (social media) वापर आजकाल वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात मोबाईल असल्याने कोणीही, कसंही सोशल मीडिया वापरू शकतं. मात्र सगळेच ते जबाबदारीने वापरतात असं नाही. काहींच्या बेजबाबदार, गैरवर्तनामुळे इतरांना (social media misuse) त्रास होऊ शकतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्येही घडली. रविवारी तेथे एक सोशल मीडिया पोस्ट खूपच व्हायरल झाली होती.
‘तुम्हाला कोणाचा खून करायचा असेल किंवा खुनाची सुपारी द्यायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा’, असे या पोस्टमध्ये लिहिले होते. त्यानंतर खाली एक मोबाईल नंबरही लिहिला होता. ही पोस्ट व्हायरल होताच पोलिसांना धक्का बसला. उज्जैनचा डॉन दुर्लभ कश्यप याने ही पोस्ट केल्याची पोलिसांची समजूत होती. त्यानंतर पोलिसांच्या सायबर सेलने याप्रकरणी तपास करत पोस्टची चौकशी केली. मात्र हे कृत्य एखाद्या गुन्हेगारी टोळीचं नव्हे तर छोट्या मुलांनी काढलेली खोडी होती, हे लक्षात आल्यावर सगळेच हैराण झाले. कानपूरमध्ये हा सगळा प्रकार घडला.
मात्र त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर अशी (विचित्र) खोडी काढणाऱ्या त्या मुलांना, त्यांच्या पालकांसह पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. आणि पुन्हा असा प्रकार कधीच करू नका सांगून, त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. ही मुलं हातात मोहाईल घेऊन रील्स बनवतात, हे माहीत होतं. पण ते असं काही कृत्य करतील याची आम्हाला कल्पनाच नव्हती, असे स्पष्टीकरण पालकांनी दिले. मात्र पोलिसांनी त्या मुलांसह त्यांच्या पालकांनाही खडे बोल सुनावत चांगली कानउघडणी केली. यापुढे मुलांवर नीट लक्ष ठेवा आणि ते अशी चूर पुन्हा करणार नाहीत, याचीही काळजी घ्या असा इशारा पोलिसांनी त्यांच्या पालकांना दिला.
बघता बघता व्हायरल झाली पोस्ट
खरंतर, रविवारी या मुलांची पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल होत होती. अनेकांनी ही पोस्ट शेअर करत कानपूर पोलिसांना टॅग केले. बघता बघता ती पोस्ट खूप व्हायरल झाली. ही पोस्ट पाहताच पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली. उज्जैनचा गुंड दुर्लभ कश्यप कानपूरमध्ये स्वत:ला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना वाटत होते. त्यामुळे तो सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिस आयुक्तांनी तातडीने सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सतर्क केले.
त्यानंतर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया अकाऊंट ट्रेस केल्यावर त्यांना हे कृत्य घाटमपूर तहसीलमधील भितरगाव येथे राहणाऱ्या काही मुलांनी केल्याचे समजले. ‘ही पोस्ट करण्यामागे काहीच हेतू नव्हता, तो फक्त खोडसारळपणा होता’ असे या मुलांशी बोलल्यावर पोलिसांच्या लक्षात आले. मात्र तरीही पोलिसांनी त्या मुलांचा चांगलाच क्लास घेत कानउघडणी केली, सावध केले आणि नंतर सोडून दिले. तर त्यांच्या कुटुंबियांना या घटनेबद्दल तीव्र शब्दांत फटकारले.