मुंबई : शरद पवारांच्या विरोधात वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळे हीला (Ketaki Chitale) भोवलंय. केतकी चितळे हीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे कोर्टात (Thane Court) याप्रकरणी युक्तिवाद करण्यात आला. शनिवारी केतकी चितळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. विशेष म्हणजे यावेळी केतकी चितळे हीनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. तिच्या वतीनं कुणीही वकील कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी नेमण्यात आलेला नव्हता. कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर आता केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी (Ketaki Chitale Police Custody) सुनावणी आली. शरद पवार यांच्यावर वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या आहेत. केतकी चितळेवर कारवाई व्हावी, या अनुशंगानं सगळ्यात आधी कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अखेर तिच्या अडचणीत वाढ झाल्याचं कोर्टानं सुनावलेल्या निर्णयानंतर स्पष्ट झालंय.
वकील नसल्यानं केतकी चितळेनं स्वतःच कोर्टात युक्तिवाद केला. मला बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही का? मी राजकीय व्यक्ती नाही, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का, असा युक्तिवाद केतकी चितळेनं कोर्टात करत आपली बाजू मांडली
दरम्यान, केतकी विरोधात महाराष्ट्रभर आता तक्रारी नोंदवण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय. तिचं महाराष्ट्र दर्शन घडवून आणू, असं राष्ट्रवादी नेत्यांनी म्हटलंय. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येत केतकी चितळेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
वेडी आहे वेडी आहे केतकी चितळे वेडी आहे, अशी घोषणाबाजी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून ठाणे कोर्टाबाहेर करण्यात आली. दरम्यान, रविवारी केतकी चितळे हिला ताब्यात घेत असताना गोंधळ उडाला होता. तिच्यावर अंडी आणि शाई फेकण्यात आलेली. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी बाळगत गुप्तपणे केतकी चितळे हिला आज सकाळी ठाणे कोर्टासमोर सादर केलं. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या पोस्टवरुन चर्चांना उधाण आलंय. अनेकांनी तिच्या पोस्टवर आक्षेप नोंदवलाय. दरम्यान, याआधीदेखील अनेकवेळा केतकी चितळे ही चर्चेत आली होती. वादग्रस्त पोस्ट करुन सातत्यानं चर्चेत येणाऱ्या केतकीवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
केतकी चितळे आधी नाशिकच्या दिंडोरीमधूनही एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी आता अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय.