शाळेत गुड टच बॅड टच उपक्रमानंतर मुलीला समजलं आपल्यावर अत्याचार, पुण्यातील खडकवासलामध्ये धक्कादायक घटना
बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आणखी काही घटना समोर येत आहे. अशातच पुण्यातील खडकवासला येथील एका मुलीवर अत्याचाराची घटना घडली. शाळेमध्ये गुड टच बॅड टच उपक्रमानंतर मुलीला लक्षात आलं की तिच्यावर अत्याचार झालाय. त्यानंतर पोलिसांनी चतुराईने आरोपीला बेड्या ठोकल्या.
बदलापूर येथील मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर तीव्र आंदोलने सुरू असताना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील खडकवासला येथे एका विकृत 68 वर्षाच्या वृध्द नराधमाने खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या विद्यार्थ्यांनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी हवेली पोलि्सांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पॉस्को कलमाखाली गुन्हा दाखल करुन दिलीप नामदेव मते (वय 68 रा. खडकवासला) याला अटक केली आहे. हवेली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिशय गोपनीय बाळगत अत्याचार झालेल्या मुलीची विचारपूस सुरू असतानाच खडकवासला येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले त्यामुळे आरोपीला पसार होता आले नाही.
हा प्रकार शुक्रवारी 23 ऑगस्टला घडला. सकाळी नेहमीप्रमाणे अत्याचारीत मुलगी रस्त्याने पायी शाळेत चालली होती. त्यावेळी रस्त्यावर दबा धरून बसलेल्या नराधम वृद्धाने मुलीला खाऊचे आमिष दाखवून बळजबरीने घरात ओढून नेऊन अति प्रसंग केला. त्यानंतर मुलगी घरी गेली तिने कोणाला काही सांगितले नाही.
दुसऱ्या दिवशी शनिवारी 24 ऑगस्टला सकाळी शाळेत गुड टच बॅड टच उपक्रम होता . तेव्हा मुलीला कळले कि आपल्याबाबत असा प्रसंग घडला आहे. अत्याचारीत मुलीने घडलेला अतिप्रसंगाची माहिती वर्गशिक्षिकेला दिली. नंतर मुख्यध्यापकांनी मुलीच्या वडिलांना शाळेत बोलावून हकिकत सांगितली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीसह हवेली पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शितल टेंबे तपास करत आहेत या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी दिलीप मते हा विकृत मानसिकतेचा असून तो सातत्याने मुलींना छेडण्याचे प्रकार करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी त्याला समज दिली होती.