नालासोपाऱ्यात दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण, आरोपी सीसीटीव्हीत कैद
नालासोपारा पूर्व आचोळा डोंगरी येथून 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. अपहरणकर्ता मुलीला घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नालासोपारा / विजय गायकवाड : नालासोपाऱ्यात एका दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. एका माथेफिरूने हे अपहरण केल्याचे कळते. नालासोपारा पूर्व आचोळा डोंगरी येथून 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. अपहरणकर्ता मुलीला घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत आचोळा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि अपहरण कर्त्याचा फोटोही पोलिसांनी शेअर केला आहे. या इसमाला जर कोणी पाहिले तर तात्काळ आचोळा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नालासोपारा पोलिसांचे आवाहन
पोलीस कसून मुलीचा शोध घेत आहेत. अपहरणकर्ता आणि मुलगी जर कुणाला दिसली तर आचोळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना 9821211653, एपीआय यशपाल सूर्यवंशी यांना 9405955326 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कणकवलीत सहा शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न
कणकवली तालुक्यातील सावडाव गावात सहा शाळकरी मुलांचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सावडाव गावात जाऊन तेथील लोकांशी आणि त्या शाळकरी मुलांशी संवाद साधला.
पालकांना आणि विद्यार्थ्यांना धीर देत याचा कसून तपास करण्याची ग्वाही राणे यांनी दिली. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलीस तपास करून संशयितांपर्यंत पोहचतील. त्यामुळे जिल्हावासियांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.