कल्याण / सुनील जाधव : कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रिक्षाचे पैसे देत अल्पवयीन मुलाशी आधी मैत्री केली. मग लॉजवर नेत त्याला गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रितेश दुसाणे असे 40 वर्षीय आरोपी नराधमाचे नाव आहे. मुलाकडे पैसे नसल्याने त्याला मदतीचा बहाणा करुन त्याच्याशी मैत्री केली. मग आरोपीने आपला हेतू साधला.
कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणारा 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा स्टेशनला उतरला. मात्र घरी जाण्यासाठी त्याच्याकडे रिक्षावाल्याला द्यायला पैसे नव्हते. त्याने रिक्षा थेट घरी नेऊन घरुन पैसे घेऊन देऊ असा विचार करुन रिक्षा घरापर्यंत घेऊन गेला. मात्र घरी गेला तर घर बंद होते. यामुळे तो शेजारी, मित्रांकडे 100 रुपये मागत होता. पण त्याला कुणीही पैसे देत नव्हते.
रितेश दुसाणे याची नजर या मुलावर पडली. त्याने मुलाला जवळ बोलावून समस्या विचारली आणि रिक्षाचे 100 रुपये दिले. पैसे देण्याच्या बहाण्याने आरोपीने मुलाशी मैत्री केली. मग घरी कुणी नसल्याची संधी साधत त्याला आपल्यासोबत लॉजवर घेऊन गेला. तेथे त्याला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले.
यानंतर नराधमाने दोन वेळा मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. या प्रकरणाची कुठे वाच्छ्ता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेल्या घटनेमुळे घाबरलेल्या मुलाने घरी जाऊन आईला हकीकत सांगितली. यानंतर घरच्यांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाणे आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करत लॉजवर दिलेल्या कागदपत्रांच्या साह्याने अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली.
कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, एपीआय हरिदास बोचरे, एपीआय दिनकर पगारे, पोलीस हवालदार कदम, पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार भामरे, पोलीस नाईक घुगे, पोलीस नाईक सांगळे आणि पोलीस शिपाई सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.