Kolhapur : अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण स्टेरॉईडच्या विळख्यात! कळलं कसं?
अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना का आणि कशी लागली स्टेरॉईडची चटक? वाचा सविस्तर वृत्त
कोल्हापूर : अग्निवीर भरतीसाठी आलेले तरुण स्टेरॉईडच्या विळख्यात अडकत असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान अजब प्रकार समोर आला आहे. भरती प्रक्रियेसाठी कोल्हापुरात तात्पुरत्या स्वरुपाचं स्वच्छतागृह उभारण्यात आलं होतं. या स्वच्छतागृहात स्टेरॉईड इंजेक्शनचा खच सापडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीत ओव्हर डोसमुळे एक तरुण बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता स्टेरॉईडचा खच आढळून आल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.
अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून असंख्य तरुण कोल्हापुरात दाखल झाले आहेत. 21 नोव्हेंबर पासून कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रिया चाचणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, उद्यापासून भरतीसाठी आलेल्या उमेदावांची वैद्यकीय चाचणीदेखील होणार आहे.
या भरतीप्रक्रियेसाठी प्रशासनातर्फेतही चोख नियोजन करण्यात आलं आहे. मात्र अग्निवीरांकडून वैद्यकीय चाचणीआधीच स्टेरॉईडचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
पाहा व्हिडीओ :
सैन्यात भरती होण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यासाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेची तयारीही तरुणांकडून करण्यात आली. प्रचंड मेहनत घेतलेल्या तरुणांकडून आता स्टेरॉईडचा वापर नेमका का केला जातोय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.
काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान, अपयश आल्याने एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. शिरोली तालुक्यातील 23 वर्षीय तरुण रमजान उर्फ आसिफ देसाई याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली होती. तब्बल 5 वर्ष प्रचंड मेहनत घेऊनही सैन्यभरतीत अपयश आल्यानं या तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली होती.
दरम्यान, आता स्टेरॉईड आढळल्याप्रकरणी पोलिसांकडून काही दखल घेतली जाते का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. स्टेरॉईड नेमके कुणी आणले, कशासाठी आणले, वापरले नेमके कुणी? आणि कोणत्या कारणासाठी? असे अनेक सवालही यानिमित्ताने आता उपस्थित केले जात आहेत.
स्टेरॉईड का वापरले जातात?
स्टेरॉईडचा वापर हा उर्जा कायम राहावी किंवा शक्ती वाढावी, क्षमतेपेक्षा जास्त कार्य करण्याइतकी ताकद मिळावी, इत्यादी कारणांसाठी केला जातो आहे. अनेकदा खेळाडूंकडूनही स्टेरॉईडचा वापर केला जातो. मात्र स्टेरॉईडचा वापर करुन चाचणी देेणं, किंवा खेळ करणं बेकायदेशीर मानलं जातंय. अशा प्रकारे स्टेरॉईड वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.