दुचाकीवरुन आले अन् रोकड लुटून पळाले, भरदिवसा घडलेल्या घटनेने जिल्ह्यात खळबळ
आजकाल गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. जळगाव शहरात भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
जळगाव : गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. दिवसाढवळ्या होत असलेले गुन्हे पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत भरदिवसा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी लाखो रुपयांची रोकड लांबवली. बँकेतील अंदाजे 15 लाखांपेक्षा रूपयांची रोकड लांबविल्याची प्राथमिक माहिती मिळते. याप्रकरणी स्थानिक पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
शस्त्राचा धाक दाखवून लुटले
दोन जण सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन आले. दोघांनी दुचाकी बँकेजवळ थांबवली आणि बँकेत घुसले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्यांना धमकावले. व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केले. यानंतर त्यांनी बँकेतील रोकड लांबवून पलायन केले.
शहरात नाकाबंदी सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून, तपास सुरू केला आहे. घटनेसंदर्भात मुक्ताईनगर पोलीस हे अलर्ट झाले असून, नाकाबंदी करून वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. बँकेतून चोरट्यांनी मोठी रक्कम व सोने लांबवली आहे. परंतु पोलीस तापसानंतर आकडा कळेल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिलीय.