नोकरीच्या बहाण्याने अधिकाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी, लातुरातील प्रकरणात नवा ट्विस्ट
तक्रारदार महिलेला आता जिल्हा परिषदेने नोकरी देण्याचा नियुक्ती आदेश दिला आहे. (Latur ZP Officer Sexual favors )
लातूर : अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने लातूर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करणाऱ्या पीडितेवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयात येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी तक्रारदार महिलेविरोधात लातूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. (Latur Crime ZP Officer allegedly demands Sexual favors from Lady new twist)
अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप पीडितेने केला होता. या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर संबंधित महिला कार्यालयात येऊन नेहमी गोंधळ करत असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारदार महिलेला आता जिल्हा परिषदेने नोकरी देण्याचा नियुक्ती आदेश दिला आहे.
काय आहे प्रकरण?
लातूर शहरातील एका शिक्षण संस्थेमध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, नियुक्ती पत्र देण्यात यावे, या मागणीसाठी पीडिता आणि तिची आई 2007 पासून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अर्ज-विनंत्या करत आहेत. नियुक्ती आदेश काढण्यासाठी सुरुवातीला पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याने अखेर निर्लज्जपणा दाखवला. पैसे नसतील, तर शरीर दे, त्यानंतर ऑर्डर काढतो, असं वक्तव्य अधिकाऱ्याने केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंदवून चौकशी सुरु करण्यात आली.
वडिलांच्या जागेवर नोकरीसाठी अर्ज
संबंधित खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक असलेल्या पीडितेच्या वडिलांचं 2007 मध्ये निधन झालं. त्यानंतर पीडितेच्या आईने शिपाई पदावर नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रयत्न केले होते. मात्र त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. दरम्यानच्या कालावधीत पीडितेने शिक्षक पदासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अनुकंपा तत्त्वावर आपणाला विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळावी, यासाठी प्रयत्न केले.
अधिकाऱ्याने आरोप फेटाळले
2017 पासून पीडिता नियुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. अधिकाऱ्याने चक्क शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे पीडितेने पोलिसात धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी पीडितेच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
रेखा जरे हत्या प्रकरणाचा सूत्रधार सापडला, बाळ बोठेला हैदराबादमध्ये बेड्या
अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा
(Latur Crime ZP Officer allegedly demands Sexual favors from Lady new twist)