लिफ्टमध्ये 4 जण … 25 व्या मजल्यावरून क्षणात जमिनीवर, मुंबईतल्या ‘त्या’ भयंकर घटनेनंतर केंद्र सरकारच्या कडक सूचना
सिद्धिविनायक सोसायटीत दुपारी दीड वाजेच्या सुमारास काचेचं केबिन असलेल्या लिफ्टमध्ये त्या दिवशी चौघं जण होते...
मुंबईः मुंबईतील विक्रोळी (Vikroli) उपनगरात घडलेल्या भयंकर घटनेनंतर केंद्र सरकारने खबरदारीची पावलं उचलली आहेत. बुधवारी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली. लिफ्टमध्ये (Lift) चौघेजण होते. २५ व्या मजल्यावर असताना लिफ्ट क्षणात जमिनीवर आदळली. या घटनेत एकाचा मृत्यू (Death) झाला. त्यानंतर आता केंद्रीय उपभोक्ता मंत्रालयाने सर्वच राज्यांना लिफ्ट अधिनियम तत्काळ प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्रालायने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, फक्त ११ राज्यांमध्येच लिफ्ट अधिनियमाचे काटेकोरपणे पालन केले जाते. याअंतर्गत इमारतींमध्ये लावल्या जाणाऱ्या लिफ्टसाठी भारतीय मानकांचे पालन करणे बंधनकारक आहे.
पण ११ राज्ये वगळता इतर राज्यांमध्ये लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांचं पालन केलं जात नाही, असं पत्रात म्हटलंय. सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना केंद्रीय उपभोक्ता मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सांहि यांनी सदर नियमांनुसार, तत्काळ कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतली ती घटना काय?
मुंबईतील विक्रोळी उपनगरात बुधवारी भयंकर घटना घडली. स्टेशन रोडवरील सिद्धिविनायक सोसायटीत दुपारी दीड वाजेच्या सुमारास काचेचं केबिन असलेल्या लिफ्टमध्ये चौघं जण होते. पण 25 व्या मजल्यावरून लिफ्ट थेट ग्राउंड फ्लोअरवर कोसळली.
लिफ्टचा दरवाजा उघडत नव्हता. अग्निशमक दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडला. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चौघांपैकी तिघेजण लिफ्टमधून बाहेर आले. मात्र चौथ्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला जास्त प्रयत्न करावे लागले.
बाहेर काढल्यानंतर महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात त्याला नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.