धुळे : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण शांत होत नाही तोच धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिव्ह इन पार्टरने हत्या करुन 70 तुकडे करण्याची धमकी दिल्याची तक्रार एका तरुणीने पोलिसात दाखल केली आहे. अरशद सलीम मलिक असे धमकी देणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत अशरद आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे.
पीडित तरुणीचे आधी लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा देखील आहे. मात्र 2019 मध्ये अपघातात तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर तिची ओळख हर्षद माळी नामक तरुणाशी झाली.
हर्षदने तिला बळजबरीने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्काराचा व्हिडिओही बनवून तिला धमकावू लागला. त्यानंतर दोघांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 2021 पासून दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.
लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा प्रतिज्ञापत्र करण्यासाठी दोघे अमलनेरला गेले, तेव्हा हर्षदचे खरे नाव अरशद सलीम मलिक असल्याचे तरुणीला कळले.
यानंतर आरोपी तिला उस्मानाबादमधील फ्लॅटवर घेऊन गेला आणि तिथे तिचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. तसेच तिच्या मुलाचा खतना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशरदच्या वडिलांनी तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला.
यावर्षी ऑगस्टमध्ये पीडितेने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. यानंतरही तिच्यावरील अनैसर्गिक अत्याचार वाढतच होता. तरुणीने या सर्वाला विरोध केला असता आरोपीने तिला श्रद्धा वालकर हत्याकांडाची आठवण करुन दिली.
श्रद्धाचे 35 तुकडेच केले होते, तुझे 70 तुकडे करीन, अशी धमकी अरशदने पीडितेला दिली. यानंतर पीडितेने पोलिसात धाव घेत सर्व आपबीती पोलिसांना सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी अरशद आणि त्याचे वडील सलीम यांच्याविरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.