लग्नाला नकार दिला म्हणून संतापला प्रियकर, पोलिस स्टेशनसमोरच प्रेयसीवर केला चाकूने वार
एका प्रियकराने त्याच्या विवाहीत प्रेयसीवर सर्वांसमोर चाकूने वार केला.
अजमेर : राजस्थानमधील अजमेर (Ajmer) येथे मंगळवारी एका प्रियकराने विवाहितेची चाकूने भोसकून हत्या केली. हा गुन्हा करणारा कथित प्रियकर विवान याचे मृत तरूणी कीर्ती हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. कीर्तीने नकार दिल्याने त्याने रस्त्याच्या मधोमधच सर्वांसमोर तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि तेथून पळ काढला. जखमी किर्तीला जवाहरलाल नेहरू (hospital) रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेच्या २४ तासांत आरोपी विवानला अटक करण्यात आली.
कीर्ती हिचे पती आर्थिक व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे कीर्ती आपल्या मुलांसह एकटीच राहत होती. विवान सोशल मीडियाच्या माध्यमातून कीर्तीच्या संपर्कात आला. त्याने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याने किर्तीला एक आयफोनही गिफ्ट दिला होता. विवान बऱ्याच दिवसांपासून कीर्तीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. विवानवर नाराज झालेल्या कीर्तीने तिचा मित्र प्रोफेसर अनिल शर्मा यांना याबाबत सांगितले होते.
रेस्टॉरंटमध्ये बसून आधी केली चर्चा, नंतर हल्ला
अनिल शर्मा आणि कीर्तीच्या वाढत्या जवळीकांमुळे विवानला त्रास झाला होता. तो कीर्तीवर लग्नाबाबत दबाव टाकत होता. घटनेच्या दिवशी विवान, कीर्ती आणि अनिल एका रेस्टॉरंटमध्ये भेटले होते. अनिलने विवानला समजावून सांगितल्यानंतर तिघेही निघून गेले. काही वेळाने विवानने कीर्तीवर नाका मदार चौकीसमोर चाकूने हल्ला केला. विवानने मिनिटभरातत कीर्तीवर अनेक वेळा हल्ला केला आणि तेथून पळ काढला. त्याचवेळी कीर्तीचा मित्र अनिल हाही तेथेच होता. त्याने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने किर्तीला रुग्णालयात नेले. त्याचवेळी, अटकेनंतरही विवानच्या चेहऱ्यावर भीती नव्हती किंवा त्याला आपल्या कृत्याचा पश्चातापही नव्हता. अजमेर पोलीस विवानचे कॉल डिटेल्स, त्याचा उत्पन्नाचे स्त्रोत आणि गुन्हेगारी कारवाया या सर्व गोष्टींचा बारकाईने तपास करत आहेत.