वर्षभरापासून विभक्त, नातेवाईकांच्या घरी पती-पत्नी मृतावस्थेत, बायकोचा जीव घेऊन नवऱ्याची आत्महत्या?
जितेंद्र आणि रंजिता हे ईश्वर नगरमध्ये भाड्याने राहणारे त्यांचे नातेवाईक काळूरामच्या घरी थांबले होते. जितेंद्र आणि रंजीता हे पती-पत्नी होते, मात्र दोघांमध्ये मतभेद वाढल्यामुळे जवळपास एक वर्षापासून ते वेगळे राहत असल्याचा दावा केला जातो
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Madhya Pradesh Crime News) एका खोलीत पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. ही घटना शाहपुरा भागातील आहे. मयत दाम्पत्य त्यांच्या नातेवाईकाकडे राहायला आले होते. जितेंद्र असे मृत पतीचे नाव असून त्यांच्या पत्नीचे नाव रंजिता होते. हे घर त्यांचे नातेवाईक काळूराम यांनी भाड्याने घेतले असून घटना घडली तेव्हा तेही घरात होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह (Dead Body) ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
काय आहे प्रकरण?
शाहपुरा पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी दिलेल्या माहितीनुसार, खंडवा येथे राहणारे जितेंद्र आणि रंजिता हे ईश्वर नगरमध्ये भाड्याने राहणारे त्यांचे नातेवाईक काळूरामच्या घरी थांबले होते. जितेंद्र आणि रंजीता हे पती-पत्नी होते, मात्र दोघांमध्ये मतभेद वाढल्यामुळे जवळपास एक वर्षापासून ते वेगळे राहत असल्याचा दावा केला जातो. पत्नीने पतीपासून वेगळे राहण्याबाबत खांडवा येथे याचिका केली होती. याच्या तपासासाठी एक पथकही तयार करण्यात आले होते.
बायकोचा जीव घेऊन नवऱ्याची आत्महत्या?
शाहपुराच्या टीआयनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी रंजिताचा मृतदेह बेडवर होता, तर पतीचा मृतदेह फासावर लटकलेला होता. पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली असावी, असे प्रथमदर्शनी दिसत होते, मात्र मृताच्या मानेवर कोणत्याही खुणा असल्याचे डॉक्टरांनी नाकारले आहे, त्यामुळे महिलेची हत्या कशी झाली याचे उत्तर पोलिसांकडे नाही.
जितेंद्र एक दिवस आधी पत्नीसोबत नातेवाईकांकडे आला होता, त्यावेळी दोघेही नॉर्मल दिसत होते. मात्र सकाळी बराच वेळ दोघेही खोलीबाहेर न आल्याने नातेवाईकांना संशय आला.
दोघेही खोलीबाहेर न आल्याने संशय
दरम्यान, काळूराम कामासाठी निघून गेले, मात्र त्यांचा मुलगा बराच वेळ दोघे बाहेर येण्याची वाट पाहत होता. अनेक तास उलटूनही आतून आवाज न आल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडला असता खोलीत दोघांचेही मृतदेह आढळून आले.
सध्या पोलीस शव विच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत, जेणेकरून दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत मृतांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळेल.