मुलगा सतत सायकल मागत होता, हट्ट करत होता; चिडलेल्या बापाने थेट कुऱ्हाडच…
मुलाच्या सततच्या मागणीला, हट्टाला कंटाळून वडिलांनी हे धक्कादायक कृत्य केले. या घटनेनंतर ते घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
भोपाळ | 19 सप्टेंबर 2023 : मुलाच्या हट्टामुळे वैतागून वडिलांनी आपल्याच पोटच्या पोराला संपवल्याची धक्कादायक ( shocking crime news) घटना घडली आहे. मध्य प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण गाव हादरलं आहे. रागाच्या भरात हे कृत्य केल्यानंतर वडील तेथून फरार (father absconding ) झाले. सागर जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
सागर जिल्ह्यातील बांदा पोलिस स्टेशन भागातील कांती गावात ही दुर्दैवी घटना घडली. पित्याने त्याच्याच पोटच्या गोळ्याची, अवघ्या १२ वर्षांच्या निरागस मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षांचा यशवंत हा मुलगा हा त्याच्या वडीलांकडे, निरपत यांच्याकडे सतत सायकलची मागणी करत होता. आपण माझ्यासाठी सायकल आणूयाच असा हट्टही तो गेल्या अनेक दिवसांपासून करत होता. मात्र त्याच्या वडिलांकडे एवढे पैसे नव्हते. त्यांनी त्याला तसे सांगत, समजावण्याचाही प्रयत्न केला पण यशवंत काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याचा आपला एकच हट्ट सुरू होता, सायकल आणूया, सायकल आणूया. यामुळे त्याचे वडील वैतागले, प्रचंड संतापले. आणि त्याच रागाच्या भरात त्यांनी त्यांच्या सख्ख्या मुलावर धारदार कुऱ्हाडीने थेट वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यशवंतचा जागीच मृत्यू झाला.
या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. तर रागाच्या भरात आपण काय करून बसलो हे वडील निरपत यांना लक्षात आले आणि ते तेथून लगेचच फरार झाले. हत्येचे वृत्त कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला.
बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी नासिर अहमद फारुकी यांनी सांगितले की, वडिलांनी आपल्या मुलाची त्यांच्या घरी कुऱ्हाडीने हत्या केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपासून आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले.