महादेव ॲप प्रकरणात आलं बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याचं नाव, FIR दाखल
महादेव ऑनलाइन ॲप केसमध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत बऱ्याच जणांना अटक करण्यात आली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावेही याप्रकरणी समोर आली, ते ईडीच्या रडारवरही होते. काहींची तर चौकशीही करण्यात आली. याप्रकरणी आता नवी, धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : महादेव ऑनलाइन ॲप (Mahadev App Scam) केस गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याप्रकरणी सौरभ चंद्राकरसह अनेकांना अटक करण्यात आली. तर गेल्या महिन्यातच या ॲपचा एक संचालक आणि सौरभ चंद्राकरचा जवळचा सहकारी मृगांक मिश्रा यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांना चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने समन्स बजावल्याने हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं होतं.
आता याप्रकरणी आणखी एक मोठी, धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खानचेही नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आले आहे.
एफआयआरची प्रत आली बाहेर, धक्कादायक खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी महादेव बुक ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी या 31 जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. यामध्ये 31 जणांविरुद्ध एफआयआर आहे, तर 32 क्रमांक अनोळखी लोकांविरुद्ध आहे. आता या प्रकरणाची एफआयआर प्रत बाहेर आल्याने एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. त्यानुसार या एफआयआरमध्ये अभिनेता साहिल खानचेही नाव आहे. या एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक 26 म्हणून अभिनेता साहिल खानचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे अभिनेता साहिल खान याच्यावर महादेव ऑनलाइन ॲपशी संबंधित आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप आहे. साहिल खान याने केवळ प्रमोशनच केले नाही तर त्याने ॲप ऑपरेट करून त्या माध्यमातून प्रचंड नफा मिळवला, असा आरोप लावण्यात आला आहे.
याप्रकरणी माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. यामुळे लोकांची 15,000 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा बनकर यांनी केला आहे. तसेच तक्रार दाखल करताना माटुंगा पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हाही दाखल केला आहे, माटुंगा पोलीस ठाण्यात आयपीसी 20,467,468,471,120 (बी) आणि जुगार कायदा, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे आरोप ?
अभिनेता साहिल खानवर आरोप आहे की तो सेलिब्रिटींना बोलावून पार्ट्या आयोजित करत असे. ॲप ऑपरेटर म्हणून अभिनेत्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचे या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्या अडचणी वाढू शकतात. खिलाडी नावाचे बेटिंग ॲप चालवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी साहिल खान दुबईमध्ये ऑनलाइन बेटिंग ॲपच्या पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसला होता. आता त्याच्यावर काय कारवाई होते हे पहावे लागेल.
बंदीनंतरही सट्टा सुरूच राहणार ?
दरम्यान महादेव ॲपप्रकरणी केंद्र सरकारने मोठी कारवाई केली. केंद्र सरकारतर्फे महादेव ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्सवर बंदी घालण्यात आली. ईडीच्या विनंतीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही कारवाई केली. यासंदर्भात मंत्रालयाने आदेशही जारी केला आहे. मात्र त्यानंतर महादेव ॲपने याचा कारभार सुरू ठेवण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. महादेव ॲपने त्यांचं डोमेन चेंज केलं. नवीन डोमेनमध्ये जुना आयडी आणि पासवर्ड तसाच राहणार असल्याचे महादेव ॲपतर्फे सांगण्यात आलं आहे. काहीही बदलणार नाही. सट्टेबाजी करणाऱ्या सर्व बुकींनी येथे बेट लावावे. रविवारी महादेव ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्स ब्लॉक करण्यात आली होती.