Mahadev App : सट्टा सुरूच राहणार ? सरकारच्या बंदीनंतरही महादेव ॲपच्या चालकांनी लढवली नवी शक्कल
महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप केसमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच जणांना अटक करण्यात आली आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकारही याप्रकरणी ईडीच्या रडारवर असून त्यांची चौकशी झाली आहे. सरकारने महादेव ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्सवर बंदी घातली असली तरी महादेव ॲपने नवी शक्कल लढवत यातूनही मार्ग काढला आहे.
मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : महादेव ऑनलाइन ॲप (Mahadev App Scam) केस गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांना चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने समन्स बजावल्याने हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारने रविवारी मोठी कारवाई केली. केंद्र सरकारतर्फे महादेव ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. ईडीच्या विनंतीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. यासंदर्भात मंत्रालयाने आदेशही जारी केला आहे.
मात्र त्यानंतर महादेव ॲपने याचा कारभार सुरू ठेवण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. महादेव ॲपने त्यांचं डोमेन चेंज केलं आहे. नवीन डोमेनमध्ये जुना आयडी आणि पासवर्ड तसाच राहणार असल्याचे महादेव ॲपतर्फे सांगण्यात आलं आहे. काहीही बदलणार नाही. सट्टेबाजी करणाऱ्या सर्व बुकींनी येथे बेट लावावे. रविवारी महादेव ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्स ब्लॉक करण्यात आली होती.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र राज्य सरकारकडून तशी मागणी करण्यात आली नाही.
सापडला नवा मार्ग
केंद्र सरकारने घातलेला बंदी आणि ईडीच्या कारवाईनंतर महादेव ॲपला नवा मार्ग सापडला आहे. त्यांनी त्याच्या वेबसाइटचे डोमेनच बदलले आहे. ॲपतर्फेच ही माहिती देण्यात त्यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे. महादेव बुकने जे नवीन डोमेन जारी केले आहे त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, सट्टा लावणारे सर्व बुकी, त्यांचा जुना आयडी आणि पासवर्ड तसाच राहील. फक्त वेबसाइटचे डोमेन बदलले आहे.
रविवारी भारत सरकारने महादेव बुकसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्सवर मोठी कारवाई केली. सरकारने ही सर्व ॲप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. ईडीने केलेल्या विनंतीनंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे.
सरकारने बेटिंग ॲप्सवर केली कडक कारवाई
सरकारच्या या कारवाईनंतर ऑनलाइन बेटिंग ॲप्सवरून पैसे कमावणाऱ्यांचा त्रास वाढला आहे. खरेतर, ऑनलाइन बेटिंग ॲप्सवर कडक कारवाई करताना सरकारने महादेव ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्सवर बंदी घातली. अवघ्या काही महिन्यांतच देशभरातील १२ लाखांहून अधिक लोक महादेव बुक ॲपमध्ये सामील झाले होते आणि याद्वारे लोकांनी क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावण्यासाठी या ॲपचा वापर करण्यास सुरुवात केली.
महादेव बेटिंग ॲपचं बॉलीवूड कनेक्शन
खरंतर, महादेव ॲपच्या सौरभ चंद्राकरने फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न केलं. दुबईत हा लग्नसोहळा पार पडला. त्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना चार्टर्ड प्लेनने बोलावण्यात आलं. त्यांच्यासोबतच पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांनाही बोलावलं होतं.
दरम्यान, येणाऱ्या काळात ईडी आणखी काही कलाकारांना समन्स बजावू शकते असं सांगितलं जात आहे. कृष्णा अभिषेक, पुलकित सम्राट, भारती सिंह, सनी लिओनीसही अनेक स्टार्स ईडीच्या रडावर आहे. या परफॉर्मन्सच्या बदल्यात सर्व कलाकारांना हवालाद्वारे कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, रणबीर कपूरवर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच्या सपोर्टिंग ॲपची जाहिरात केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच दुबईतील परफॉर्मन्समध्ये सहभागी असलेल्या अनेक कलाकार ईडीच्या रडारवर असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून 417 कोटींची संपत्ती जप्त केली होती.