Mahadev App Scam : मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर दुबईत नजरकैदेत, लवकरच भारतात आणणार ?
महादेव ॲप घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला दुबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. दुबई पोलिसांनी सौरभ चंद्राकरवर पाळत ठेवली आहे. सौरभ चंद्राकरला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
Mahadev App Scam : महादेव ॲप घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला दुबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई पोलिसांनी सौरभ चंद्राकर याला नजरकैदेत ठेवले आहे. त्याला दुबईतील एका घरात ठेवून त्याच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. एजन्सीच्या (ईडी) विनंतीवरून इंटरपोलने मुख्य आरोपी सौरभविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.
इंटरपोलने जारी केली होती रेड कॉर्नर नोटीस
ईडीच्या म्हणण्यानुसार, सौरभ चंद्राकर आणि दुसरा प्रवर्तक रवी उप्पल हे यूएईमधील एका सेंट्रलाइज्ड ऑफीसमधून महादेव बेटिंग ॲपचालवत होते. यासोबतच मनी लाँड्रिंग आणि हवालाचे व्यवहारही केले जात होते. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार हा सुमारे 6000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलने आरोपींविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
महादेव ॲपचे दाऊद कनेक्शन
तसेच ईडीने महादेव ॲपबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, महादेव ॲप ऑपरेट करणारे सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल पाकिस्तानमध्ये डी-कंपनीला सपोर्ट करत होते. डी कंपनीच्या सांगण्यावरून सौरभ चंद्राकरने दाऊद इब्राहिमचा भाऊ मुस्तकीम इब्राहिम कासकर याच्यासोबत हे ॲप ऑपरेट करण्यासाठी भागीदारी करून हे ॲप तयार केल्याचेही तपासात समोर आले आहे.
सट्टेबाजी ॲप्सवर सरकारची कडक कारवाई
भारत सरकारने महादेव बुकसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्सवर मोठी कारवाई केली होती. सरकारने ही सर्व ॲप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या. ईडीने केलेल्या विनंतीनंतर केंद्र सरकारने ही कारवाई केतली होती. या ॲप्सचे ऑपरेशन बेकायदेशीर असल्याचे तपासात ईडीने घोषित केले होते.
अनेक सेलिब्रिटींचे नावही आले समोर
काही महिन्यांतच देशभरातील 12 लाखांहून अधिक लोक महादेव ॲपमध्ये सामील झाले होते. याद्वारे लोक क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावण्यासाठी या ॲपचा वापर करू लागले. या घोटाळ्यात बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींचीही नावे समोर आली आहेत. याबाबत अनेकांना समन्स पाठवण्यात आले होते. चित्रपट कलाकारांनी या ॲपचे प्रमोशन केले होते. काही लोकांची ईडीतर्फे कसून चौकशीही करण्यात आली.