वडिलांपाठोपाठ लेकही गेला, कृषी पंपाचे कनेक्शन जोडताना खांबावरच शॉक, 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू
विलासचे वडील रामकृष्ण बोडखे यांचे जेमतेम 20 ते 25 दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे एकामागून एक झालेल्या दुसऱ्या आघातामुळे बोडखे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
बुलडाणा : वडिलांनंतर कुटुंबाचा आधार असलेला कर्ता लेकही काळाने हिरावून घेतला. वडिलांच्या निधनाला 20 ते 25 दिवस उलटले नाहीत, तोच मुलाचंही निधन झालं. 32 वर्षीय मुलगा कंत्राटावरील कामगार म्हणून कार्यरत होता. कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन जोडताना शॉक लागून त्याला प्राण गमवावे लागले.
काय आहे प्रकरण?
बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीच्या जामोद उपकेंद्रात 32 वर्षीय विलास रामकृष्ण बोडखे कार्यरत होता. विलास मागील सात ते आठ वर्षांपासून आऊटसोर्सिंगमध्ये काम करत होता. यावेळी कृषी पंपाचे कनेक्शन जोडत असताना शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
खांबावर विजेचा धक्का
विलास बोडखे हा खांबावर जाऊन विद्युत कनेक्शन जोडत होता, मात्र त्याला विजेचा अचानक झटका बसला आणि तो खाली कोसळला. परिसरतील ग्रामस्थांनी तात्काळ विलासला रुग्णालयात उपचारासाठी नेले. प्रथमोपचार झाल्यावर अन्य रुग्णालयात त्याला नेले जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
कुटुंबावर दोन आघात
विलासचे वडील रामकृष्ण बोडखे यांचे जेमतेम 20 ते 25 दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे एकामागून एक झालेल्या दुसऱ्या आघातामुळे बोडखे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. परिवारावर शोककळा पसरली असून गावात या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
जेलमधून संचित सुट्टीवर बाहेर, गावकऱ्याचं घर पेटवणाऱ्या तरुणाला तीन वर्ष सक्तमजुरी
अंगावर गाडी घातली, फरफटत नेलं, 2 हजारांसाठी वर्धा जिल्ह्यात हत्या