प्लॅटफॉर्मच्या कामाचा प्रवाशाला फटका, ट्रेनमध्ये चढताना पाय अडकला, रेल्वे सुटल्याने गुडघ्याखाली कापला
हिमायतनगर तालुक्यातील हदगाव रोड स्टेशनवर कृष्णा इंटरसिटी एक्सप्रेस गाडीतून उतरलेला तरुण परत गाडीत चढताना दोन सिमेंट गट्टुच्या फटीत पाय अडकल्याने धावत्या रेल्वेखाली आला. त्यामुळे त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली कापला गेला आहे.
नांदेड : रेल्वे प्लॅटफॉर्मचे (Railway Accident) काम सुरू असल्याने एका प्रवाशाला आपला पाय गमवावा लागला. नांदेड जिल्ह्यातील हदगांव रोड रेल्वे स्थानकावर (Hadgaon Road Railway Station) ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. रेल्वेने प्रवास करणारा शेख मुखीन हा पाणी पिण्यासाठी खाली उतरला होता, त्यानंतर रेल्वेत चढत असताना त्याचा पाय सिमेंटच्या विटात अडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. इथल्या रेल्वे प्लॅटफॉर्मचे काम रेंगाळले असून त्यामुळे आतापर्यंत तीन प्रवाशांचे असेच अपघात झाले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.
काय आहे प्रकरण?
हिमायतनगर तालुक्यातील हदगाव रोड स्टेशनवर कृष्णा इंटरसिटी एक्सप्रेस गाडीतून उतरलेला तरुण परत गाडीत चढताना दोन सिमेंट गट्टुच्या फटीत पाय अडकल्याने धावत्या रेल्वेखाली आला. त्यामुळे त्याचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली कापला गेला आहे. ही घटना काल (मंगळवारी) दुपारी साडे चार वाजताच्या सुमारास घडली.
रखडलेल्या कामाचा फटका
हदगाव रोड रेल्वे फलाटाचे काम मागील वर्षापासून गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे रेंगाळलेले आहे. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत असून दिवसा, रात्री उशीरा स्टेशनवर उतरलेल्या प्रवाशांना जीवावर बेतण्याचे प्रसंग ओढवत आहेत.
कोरोनानंतर रेल्वे सुरू झाल्यापासून रेल्वे फलाटावर किरकोळ अपघात वगळता पाय तुटण्याच्या मोडण्याच्या तीन घटना घडल्या, तरी गुत्तेदाराच्या कामात सुधारणा झाली नाही.
नेमकं काय घडलं?
किनवटच्या सरदार नगर भागातील शे. मुखीन शे. रहिम (वय 25 वर्ष) हा तरूण कृष्णा इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेने नांदेड ते किनवट दरम्यान प्रवास करत होता. ट्रेन हदगाव फलाटावर थांबताच हा तरुण पाणी पिण्यासाठी उतरला. परत रेल्वेत चढत होता, त्यावेळी रेल्वे फलाटाचे काम अर्धवट असलेल्या मोठ्या दोन गट्टुच्या फटीत त्याचा पाय अडकला. यावेळी रेल्वे गती घेत असताना तो रेल्वे खाली आला, याच वेळी त्याच्या उजव्या पायाचा चेंदामेंदा झाला.
तरूणाचा जीव वाचवण्यासाठी सरपंच किशोर आदवाडे, अभिजीत देवसरकर, खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार यांनी घटनास्थळावर हजर होऊन प्रयत्न केले, जायमोक्यावरूनच किनवट येथील सरदारनगरचे नगरसेवक अभय महाजन यांच्या माध्यमातून नातेवाईकांना जखमी तरुणासोबत फोनवर संपर्क साधून बोलणे करून दिले. येथे हजर असलेल्या स. इब्राहिम, स. मुबीन, काही तरुणांच्या मदतीने रूग्णवाहिकेत टाकून त्याला उपचारासाठी पाठवले. अपघातग्रस्त रुग्णावर सध्या नांदेड येथे उपचार सुरु आहेत.