नांदेड : नांदेडमध्ये दोन दुचाकी आमनेसामने धडकल्याने (Bike Accident) एक जण जागीच ठार झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री नांदेड शहरातील मालेगाव रोडवरच्या (Nanded) तुळशीराम नगरजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात स्वप्नील ढवळे हा युवक जागीच ठार झाला, तर अन्य दोन युवक या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे तरोडा खुर्द या उपनगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तरोडा खुर्द भागातील मालेगांव रोडचे काम गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी घिसाडघाईत करण्यात आलं. निवडणुकीत पुढाऱ्यांना फंड देण्यासाठी या रस्त्याच्या कामात दर्जा राखण्यात आला नाही. त्यामुळे या रस्त्यावर जागोजागी चिखल आणि पाणी साचतंय. याच चिखल पाण्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
दरम्यान, याच रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने अपघात होत आहेत. हा रस्ता बनवताना कुठे सिमेंट तर कुठे डांबर असा मिश्र प्रयोग राबवण्यात आला, त्यातून जागोजागी हा रस्ता खाली-वर झालाय. तर पावसाळ्यात रस्त्यावर चिखल साचून हा रस्ता घसरगुंडी बनलाय, त्यातून अपघाताची संख्या वाढलीय.
मध्यरात्री जिथे हा अपघात झाला तिथेच एक नैसर्गिक नाला अडवण्यात आलाय, शहरीकरण होत असताना या नाल्याच्या जागेवर घरे उभे राहिलीत. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर साचतंय, त्यातून रस्त्यावर चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरलंय. पावसाळ्यात तर इथे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असते. मुंबई प्रमाणे इथे तुंबलेल्या पाणी काढण्यासाठी पंपाची देखील व्यवस्था नाही त्यामुळे थोडा जरी जास्तीचा पाऊस झाला तरी हा रस्ता पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद असतो.
मध्यरात्री झालेल्या अपघाताच्या बाजूलाच स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर यांचे सिमेंट गजाळीचे दुकान आहे. या दुकानापासून कल्याणकर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली, गेल्या टर्म मध्ये याच भागाचे नगरसेवक असलेल्या कल्याणकर यांना स्थानिकांनी थेट विधानसभेत पाठवले. मात्र त्यांच्या दुकानाच्या जवळ असलेल्या या नाल्याचा प्रश्न त्यांना अद्याप सोडवता आला नाही. आता या युवकाचा बळी गेल्यानंतर तरी रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी स्थानिकांनी केलीय.