बीड : लग्नाच्या प्रलोभनापोटी दोन वेळा धर्म (Religion Change) बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्ञानेश्वर नागरगोजे (Dnyaneshwar Nagargoje) हा मोहम्मद शहजाद मनोहर झाला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच पुन्हा त्याने हिंदू धर्मात प्रवेश करत असल्याचा बॉंड जाहीर केला. बीड जिल्ह्यातील परळी (Parali Beed) तालुक्यात ही आश्चर्यकारक घटना घडल्याची माहिती आहे. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी पैसे आणि मुस्लिम मुलीशी विवाह लावून देण्याचे आमिष दाखवून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील मांडवा गावात ही घटना समोर आली आहे. लग्नाच्या प्रलोभनापोटी तरुणाने हिंदू ते मुस्लीम आणि पुन्हा मुस्लीम ते हिंदू असे धर्मांतर केले. 35 वर्षीय ज्ञानेश्वर मनोहर नागरगोजे असे या तरुणाचे नाव आहे.
ज्ञानेश्वरने मुस्लीम धर्मात प्रवेश करत असल्याचं बॉंड पेपरवरुन लिहून दिले. 11 फेब्रुवारीला घोषणापत्र जाहीर केले. त्यानंतर लगेच सहा दिवसांनी म्हणजेच 17 फेब्रुवारीला लग्न-पैशाचे आमिष दाखवून धर्म बदलायला लावला, असा दुसरा नोटरी केलेला बॉंड समोर आला. या सर्व प्रकारामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे बीडमध्ये सापडण्याचा प्रकार नवीन नाही. याआधी बेकायदेशीर धर्मांतर प्रकरण उत्तर प्रदेशात चांगलेच गाजले आहे. यूपीतील धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन बीडमध्ये असल्याची धक्कादायक माहिती गेल्या वर्षी समोर आली होती. इरफान खान नावाच्या तरुणाला अवैध धर्मांतर प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतले होते. इरफान मूळ बीडमधील परळी तालुक्यातील रहिवासी आहे.