वाळू वाहतुकीच्या परवानगीसाठी 1.30 लाखांची मागणी, पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळकेंवर लाचखोरीचा आरोप
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. वाळू वाहतूक करु देण्यासाठी एक लाख तीस हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.
औरंगाबाद : पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी वाळू वाहतूक करु देण्यासाठी एक लाख तीस हजार रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. खासगी व्यक्तीच्या माध्यमातून शेळकेंनी चेंबरमध्ये भेट घेत लाचेच्या मागणीचे समर्थन करून लाच घेण्याबाबत प्रोत्साहन दिल्याचा दावा केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रारदाराचा शेती आणि वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. भागिदारीत असणाऱ्या शेतात अतिवृष्टीमुळे नदीतील वाळूचा साठा झाला आहे. या वाळूचा उपसा करणे आणि दोन हायवाद्वारे वाळू वाहतूक करण्यासाठी तहसीलदार शेळके यांनी नारायण वाघ या खासगी व्यक्तीच्या मार्फत पंच साक्षीदारांच्या समक्ष 1 लाख 30 हजार रुपयांची मासिक हप्ता स्वरुपात मागणी केल्याचा दावा केला जात आहे.
चेंबरमध्ये काय घडलं?
तहसीलदार शेळके यांच्या समक्ष त्यांच्या चेंबरमध्ये भेट झाली असता तहसीलदार शेळके यांनी प्रत्यक्ष पंचांसमक्ष तक्रारदार यांच्या वाळूच्या गाड्यांबद्दल बोलणी करून आरोपी असलेला खासगी व्यक्ती नारायण वाघ याला चेंबरमध्येच समक्ष भेटून घेण्याबाबत सूचना दिली. त्यानंतर वाघ यांनी केलेल्या लाचेच्या मागणीचे समर्थन करून लाच घेण्याबाबत प्रोत्साहन दिले. त्यानंतर आरोपी वाघ यांनी तहसीलदार शेळके यांच्या चेंबरच्या बाहेर येऊन पंचसाक्षीदारांच्या समक्ष 1 लाख 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
शेतकऱ्याला दमदाटी
याआधी, पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी एका शेतकऱ्याला दमदाटी तसेच शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच या शेतकऱ्याची लायकी काढत त्याला हाकलून देण्याची धमकीसुद्धा दिली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
इतर बातम्या :
Video | तहसीलदाराची शेतकऱ्याला शिवीगाळ, लायकी काढत हाकलून देण्याची धमकी, नागरिकांत संताप