Beed Murder | शेतात झोपलेल्या वृद्धाची हत्या, खुनाचे सत्र सुरूच राहील, मृतदेहाजवळील चिठ्ठीतून इशारा
या घटनेनंतर शिरूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. कुंडलिक विघ्ने असे मृताचे नाव असून त्यांची गावाजवळ शेती आहे. याच ठिकाणी ते झोपण्यासाठी शेतात गेले होते.
बीड : बीडच्या शिरूर कासार इथल्या आनंदगाव येथून एक धक्कादायक घटना (Beed Crime News) समोर आलीय. शेतात उघड्यावर झोपलेल्या वृद्धाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली असून इथे आढळलेल्या नोटमध्ये खुनाचे सत्र सुरूच राहील असा इशारा दिला गेलाय. या हत्येचे गूढ (Murder) कायम असून मारेकरी माथेफिरु असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान या घटनेनंतर शिरूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. कुंडलिक विघ्ने असे मृताचे नाव असून त्यांची गावाजवळ शेती आहे. याच ठिकाणी ते झोपण्यासाठी शेतात गेले होते.
काय आहे चिठ्ठीत?
साक्या विठ्ठल काळे भोकऱ्या विठ्ठल काळे शेशराव विठ्ठल काळे गोकुळ विठ्ठल काळे धिवरे सुखराम चव्हाण यांनी चौघा जणांना मारण्याची सुपारी दिली बाईला मारण्याची सुपारी साक्यानी दिली साक्याचं बाईवर प्रेम होते बाईच्या पतीला मारण्याची सुपारी दिली दोन लाख रुपये धिवरे यांनी दिली पोलीस स्टेशन यांना चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती खांबा लिंबा या गावांमध्ये वरील चौघांनी मर्डर केलेला आहे वरील कारवाई न झाल्यास पत्रकार परिषद घेण्यात येईल एसपी साहेबांना भेटण्यात येईल गृहमंत्री साहेबांना oc पाठवण्यात येईल तरी मर्डर सत्र थांबवावे, नाहीतर पुन्हा 302 घेण्यात येईल
दरम्यान, बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे बाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार आणि खून दरोड्याचे प्रमाण वाढते आहे. यावर जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन गुन्हेगारांवर वचक बसवावा अशी मागणी केली आहे.