ट्रकच्या चेसिस आणि इंजिन नंबरची खाडाखोड करुन बनावट क्रमांक, धुळ्यात टोळीचा पर्दाफाश
या गुन्ह्याच्या चौकशीत आतापर्यंत आरोपी व त्यांचे साथीदारांनी एकूण 27 ट्रकवर बनावट इंजीन व चेसीस नंबर टाकून विक्री केल्याची माहिती मिळून आली आहे. तरी अशा प्रकारचे बनावट इंजीन व चेसीस नंबर प्रेस केलेले ट्रक कोणाकडे असतील तर संबंधितांनी सदर ट्रक तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, धुळे येथे जमा करावे
धुळे : ट्रकचे (Truck) चेचीस आणि इंजिन नंबर (Engine Number) खाडाखोड करून बनावट नंबर टाकून वाहनांची विक्री करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे. या टोळीकडून एकूण एक कोटी 44 लाख रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टोळीने 27 ट्रक्सवर बनावट इंजिन व चेचीस नंबर टाकून ते विक्री केल्याची माहिती उघडकीस आली आहे. तरी संबंधितांनी तात्काळ खरेदी केलेले ट्रक स्थानिक गुन्हे शाखेत जमा करावे अन्यथा कारवाई (Dhule Crime News) करण्यात येईल असा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे .
काय आहे प्रकरण?
याबाबत सविस्तर माहिती अशी की धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की , शेख साजीद शेख अब्दुल (व्यवसाय – ट्रन्सपोर्ट कमीशन एजेंट, रा. इकरा कॉलनी घर नं 25, चाळीसगाव रोड, धुळे) याच्या राहत्या घरासमोर ट्रक क्र GI- 08 / AU7698 आणि MH 38 / X – 2602 तसेच कानुश्री मंगल कार्यालय देवपुर धुळे येथे मोकळ्या जागेत आठ ट्रक उभ्या केल्या असून ट्रकवरील इंजीन व चेसीस नंबरमध्ये अदलाबदल केलेली आहे.
1 कोटी 44 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
त्याप्रमाणे पथकाने बातमीची खात्री करता शेख साजीद शेख अब्दुल याच्या घरासमोर उभ्या असलेल्या ट्रक विक्रीसाठी आणल्याचे त्याने सांगितले . परंतु सदरच्या द्रकांची आर.टी.ओ कार्यालयाकडून खात्री करता त्यांचे चेचीस नंबर व इंजिन नंबर हे खाडाखोड करून बनावट कागदपत्राच्या आधारे विक्री करत असल्याची खात्री झाली . त्याप्रमाणे सदर ट्रक ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आल्यात. तसेच आरोपींची सखोल विचारपूस करता त्याने बऱ्याच ट्रक आरटीओ एजंटच्या माध्यमातून विक्री केल्याचे सांगितले आहे. तर या संबंधित टोळीकडून एकूण 1 कोटी 44 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी ताब्यात
धुळे शहरात चाळीसगाव रोड परिसर इकरा कॉलनीमध्ये राहणारा साजीद शेख अब्दुल मनियार, आर.टी.ओ एजंट इफतेकार अहमद अब्दुल जब्बार शेख ऊर्फ पापा एजेन्ट (रा . गल्ली नं एक तहसील ऑफिस समोर इकबाल रोड धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई राहुल प्रमोद सानप (स्थानिक गुन्हे शाखा धुळे) यांच्या माहितीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करित आहेत.
अटक आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने संगनमताने सदर बनावट ट्रक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची फसवणूक करुन वापरासाठी तसेच विक्री करण्याचे उद्देशाने बनावट इंजीन व चेसीस नंबर प्रेस करून ट्रक वापरत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांचा शोध सुरु आहे.
या गुन्ह्याच्या चौकशीत आतापर्यंत आरोपी व त्यांचे साथीदारांनी एकूण २७ ट्रकवर बनावट इंजीन व चेसीस नंबर टाकून विक्री केल्याची माहिती मिळून आली आहे. तरी अशा प्रकारचे बनावट इंजीन व चेसीस नंबर प्रेस केलेले ट्रक कोणाकडे असतील तर संबंधितांनी सदर ट्रक तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, धुळे येथे जमा करावे. अन्यथा संबंधित गाडी मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.