पोटच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाने त्रस्त, कोल्हापुरात बापाने लेकराला पंचगंगेत ढकललं
सिकंदर हे गेल्या काही वर्षांपासून कबनूर येथे राहतात. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला आजाराने वेढल्याने कुटुंबीय सततच्या खर्चाने त्रस्त झाले होते. या खर्चाला कंटाळून सिकंदरने दोन महिन्यांपूर्वी घर सोडून पलायन केले होते.
इचलकरंजी : पाच वर्षाच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाला कंटाळून जन्मदात्या बापाने त्याला नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील कबनूर गावात हा प्रकार घडला. आरोपी पिता सिकंदरने मुलाला पंचगंगा नदीत टाकल्याचा आरोप आहे.
याबाबतची नोंद गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. या पाच वर्षाच्या मुलाचा पोलीस शोध घेत आहेत. लहान मुलांची क्रूरपणे हत्या केल्याची जिल्ह्यातील ही चौथी घटना असून हातकणंगले तालुक्यातील तिसरी घटना असल्याने नागरिक हादरुन गेले आहेत.
नेमकं काय घडलं?
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सिकंदर हे गेल्या काही वर्षांपासून कबनूर येथे राहतात. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्याला आजाराने वेढल्याने कुटुंबीय सततच्या खर्चाने त्रस्त झाले होते. या खर्चाला कंटाळून सिकंदरने दोन महिन्यांपूर्वी घर सोडून पलायन केले होते.
पुलावरुन मुलाला पंचगंगेत ढकललं
सिकंदरची पत्नी आणि मेव्हण्याने त्याचा शोध घेतला. त्यावेळी मुलाला सोडून न जाण्याचा दम त्याला देण्यात आला होता. मुलाच्या आजारामुळे मुंबईला होणाऱ्या वारंवार फेर्या आणि खर्च यामुळे कंटाळलेल्या सिकंदरने गुरुवारी रात्री सायकलवरुन पंचगंगा नदी गाठली. त्यानंतर मोठ्या पुलावरुन पाच वर्षांच्या मुलाला थेट फेकून दिले.
नदीच्या पाण्यात मुलाचा शोध
त्यानंतर घरी येऊन मुलाला फेकून दिल्याची माहिती सिकंदरने नातेवाईकांना दिली. मात्र सुरुवातीला यावर कोणाचा विश्वास बसला नाही. परंतु मुलगा बराच काळ बेपत्ता असल्याने त्यांची खात्री पटली आणि नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर सिकंदरच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी पंचगंगा नदीत पाच वर्षांच्या मुलाचा शोध सुरु केला आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पाहणी केली. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात अशा प्रकारची ही चौथी घटना घडल्याने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे.
मुलीला कृष्णा नदीपात्रात ढकलले
याआधीही, वडिलांनी मुलीला नदीत ढकलून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली होती. वादानंतर बापाने मुलीला पुलावरुन कृष्णा नदीपात्रात ढकलून दिल्याचा आरोप केला जात होता. मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवणारा बाप पोलिसी खाक्या पाहायला मिळताच ततपप बोलू लागला. आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. बापानेच मुलीला कृष्णा नदीत ढकलून देत जीवे ठार मारलं, मात्र कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आधी त्यानेच मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच बापाचा बनाव उघडा पडला आणि त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली.
दानवाड पुलावरून नदीत ढकलून दिले
मुलगी आणि बापामध्ये काही कारणावरुन मोठा वाद झाला होता. त्या वादातून त्याने स्वतःच्या मुलीला कर्नाटक जुने दानवाड पुलावरून नदीत ढकलून दिले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून कुरुंदवाड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
कृष्णा नदीत ढकलून मुलीला संपवलं, मग स्वतःच पोलिसात तक्रार, वडिलांचा बनाव ‘असा’ झाला उघड
सावत्र बापाने पंचगंगेत बुडवलेल्या मुलीला शोधताना सापडला 50 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह