भारत-पाक युद्धात सहभागी नांदेडच्या माजी सैनिकाचा खून, मुलगा-सून-नातवाने संपवलं
विजयने वडिलांना बुक्क्या आणि दगडाने मारहाण केली. यात दगडाचा जबर मार लागल्याने वडील नारायण साबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.
नांदेड : काही गोष्टींपुढे सगळी नाती फिकी पडतात. असाच काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात समोर आला आहे. लहुजी नगर येथे राहणारे माजी सैनिक नारायणराव साबळे यांना जन्मदात्या मुलाने मारहाण केली. यात दगडाचा जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. नारायणराव साबळे यांनी 1965 ते 1971 या काळात झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला होता.
काय आहे प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात लहुजी नगर येथे सेवानिवृत्त माजी सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे राहत होते. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मुलगा विजय साबळे (वय 45 वर्ष) यांनी वडिलांना मारहाण केली. विजयची 40 वर्षीय पत्नी आणि 18 वर्षांचा मुलगा शुभम विजय साबळे यांनीही मारहाणीत मदत केली.
नेमकं काय घडलं?
विजयने वडिलांना बुक्क्या आणि दगडाने मारहाण केली. यात दगडाचा जबर मार लागल्याने वडील नारायण साबळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना धाकटा मुलगा दिलीप साबळे आणि पत्नी गयाबाई यांनी अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.
तिघा जणांवर हत्येचा गुन्हा
सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांच्या खून प्रकरणी दिलीप नारायण साबळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विजय नारायणराव साबळे, शुभम विजय साबळे, सौ. साबळे या तिघा जणांच्या विरूद्ध कलम 302, 323, 504, 506, 34 भादंवि प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.
1965 – 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात सहभाग
1965 – 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांचा सहभाग होता. या युद्धामध्ये त्यांच्या मांडीला एक गोळी लागली होती यामुळे त्यांना काही प्रमाणात अपंगत्व आले होते.
संबंधित बातम्या :
नालासोपाऱ्यात 80 वर्षीय महिलेची हत्या, भाऊबीजेलाच वृद्धेला राहत्या घरी कोणी संपवलं?
CCTV | पाण्याच्या बहाण्याने वॉचमन घरात शिरला, वृद्धेला बांधून दरोडा, पाडव्याला उल्हासनगरात खळबळ
शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर नाशिकमध्ये चॉपरने हल्ला; जखमींची प्रकृती चिंताजनक