नांदेड : प्रेयसीच्या बापानेच प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. शेतात नेऊन दोरीने हातपाय बांधत तरुणाची सिनेस्टाईल हत्या करण्यात आली होती. तब्बल महिन्याभरानंतर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हासनाळ (प.मु.) येथील युवक आणि युवतीमध्ये प्रेमसबंध जुळले होते. या रागातून प्रेयसीच्या बापानेच सहकाऱ्यांच्या मदतीने 31 आॕक्टोबर रोजी प्रियकराचा सिनेस्टाईल खून केला. तरुणाला शेतात नेऊन दोरीने त्याचे हात पाय बांधत त्याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली. ही घटना घडल्यानंतर तब्बल एका महिन्याने खून प्रकरणाचा छडा लावण्यास मुक्रमाबाद पोलिसांना यश आले आहे.
काय आहे प्रकरण?
एखाद्या सराईत गुन्हेगारालाही लाजवेल अशा प्रकारची घटना मुखेड तालुक्यातील हसनाळ (प.मु.) येथे घडली आहे. चार महिन्यांपूर्वी येथील सुर्यकांत नागनाथ जाधव (22 वर्ष) या युवकाचे प्रेमसंबंध गावातच असलेल्या नातलगातील मुलीशी जुळले होते. या प्रेमसंबंधांची कुणकुण मुलीच्या वडिलांना लागल्याचे प्रियकर सुर्यकांत जाधव याला समजताच भीतीने त्याने गाव सोडलं होतं.
गावात येतानाच गाठून हत्या
चार महिन्यांनंतर, 31 आॕक्टोबर रोजी पुन्हा तो गावाकडे येत होता. सुर्यकांत गावाकडे येत असल्याची माहिती मुलीच्या वडिलांना मिळताच त्यांनी सुर्यकांतचा कायमचा काटा काढायचा निर्णय घेतला. आपल्या मेहुण्यासह गावाकडे येणाऱ्या रस्त्यातच सुर्यकांत जाधवला वडिलांनी गाठले.
रावणगाव शिवारातील शेतात त्याचा खून केला. या घटनेची बाहेर वाच्यता होऊ नये, म्हणून मृतदेह खोल खड्डा करुन त्यात पुरला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
भावाची पोलिसात तक्रार
दरम्यान सुर्यकांत जाधव घराकडे आला नाही आणि त्याचा फोनही लागत नसल्याने भाऊ रवीकांत जाधव यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडत नसल्याने अखेर मुक्रमाबाद पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुक्रमाबाद ठाण्याचे सपोनि संग्राम जाधव, पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे आणि गजानन कांगणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
दोन्ही आरोपींकडून कबुली
आरोपी माधव सोपान थोटवे रा. हसनाळ (प. मु. ) आणि पंढरी गवलवाड रा. कोळनूर या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरुद्ध मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना मुखेड कोर्टासमोर हजर केले असता आरोपींना एक डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
चौकशी दरम्यान 28 तारखेला सायंकाळी आरोपींसह पोलीस घटनास्थळी गेले आणि पुरलेला मृतृदेह ताब्यात घेऊन जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार महेश हांडे, देगलुचे एपीआय कमलाकर गड्डीमे, तलाठी बळीराम कदम, यादव इबीतवार बाऱ्हाळी पोलीस चौकीचे जमादार योगेश महिंद्रकर, बब्रूवान लुंगारे, माधव पवार हे तपासात मदत करत आहेत. पुढील तपास सपोनि संग्राम जाधव हे करत आहेत .
संबंधित बातम्या :
अल्पवयीन मेहुणीच्या प्रेमात तरुण वेडापिसा, गळा चिरुन पत्नीची हत्या