नांदेड : भरदिवसा घरफोडी (Theft) झाल्याच्या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ (Nanded Crime News) उडाली आहे. हदगाव तालुक्यातील तामसा येथील पोलिस स्टेशनच्या पाठीमागे रहिवासी असलेले व्यापारी अर्जुन बोम्बल आपल्या परिवारा सोबत लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले होते. याचाच फायदा घेऊन दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान घरफोडी करण्यात आली. यावेळी रोख रक्कम 2 लाख रुपये तसेच साडेचार तोळे सोने असा एकूण 5 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लुटून पोबारा केल्याने तामस्यात घबराट पसरली आहे.
हदगाव तालुक्यातील तामसा पोलिस स्टेशनमागे राहणारे अर्जुन तुकाराम बोम्बले हे व्यापारी आहेत. तामसा या ठिकाणी त्यांचे नवीन बसस्थानक परिसरात गोळी-भांडारचे दुकान आहे. ते आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत 16 मे रोजी कुलूपबंद दरवाजा पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून दोन लाख रुपयांची रोख रक्कम आणि साडेचार तोळे वजनाचे सोने असा 5 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरी केल्याचा दावा केला जात आहे.
लग्न आटोपून घरी परत आले असता व्यापारी अर्जुन बोम्बले घरातील फोडलेली कपाट पाहून हैराण झाले. त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. तामसा पोलिस ठाण्याचे सपोनि अशोक उजगिरे, बालाजी किरवले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. यावेळी घटनेच्या ठिकाणी तामसा पोलिसांबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. तामसा परिसरात मोठ्या प्रमाणात मोबाईल मटका, गुड़ गुड़ी, ऑनलाइन लॉटरी, क्लब, जुगार यासारखे अवैध धंदे सुरु असून या ठिकाणी अद्यापही तामसा पोलिसांनी धाडसी कारवाई केलेली नाही.
तसेच तामसा गावात मोटरसायकल चोरी, घरफोडीच्या घटना घडल्या आहेत तसेच चोराचे लक्ष केवळ कुलूपबंद घरांचे टार्गेट असून या ठिकाणी शिवाजी नगर मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चोरीचे प्रमाण वाढत आहे.
काही दिवसांपूर्वी व्यापारी ओम डोनगावे यांच्या घरी रोख 2 लाख रुपये 5 तोळे सोने, 15 तोळे चांदी चोरीला गेले, तर तामसा पोलिस ठाण्यापासून काही हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या दादाराव चंदनवार यांच्या घरी 7 तोळे सोने, 20 तोळे चांदी एकूण 4 लाख 30 हजार रुपयाची भर दिवसा चोरी झाली होती. या चोरिचा तपास अवैध धंदे करणाऱ्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांना लागत नसल्याने तामसा पोलिसांबद्दल तामसा परिसरात एक वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे.
फिर्यादी अर्जुन बोम्बले यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध तामसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांनी भेट दिली तर डॉग स्कॉड बोलावून तपास केला, मात्र चोरांनी कोणतेही धागेदोरे सोडले नाहीत.