सांगलीची अल्पवयीन मुलगी, पुण्यात प्रसुती, मृत बाळाच्या जन्मानंतर बालविवाहाचा भांडाफोड
सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह माण तालुक्यातील देवापूर येथील समाधान चव्हाण याच्याशी 28 एप्रिल 2021 रोजी झाला होता.
सांगली : मृत बाळ जन्माला आल्यानंतर बालविवाहाचा (Child Marriage) धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर अल्पवयीन मुलीसह तिचे आई, वडील, पती, सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाह करून लैंगिक अत्याचार केल्याचा पतीवर आरोप आहे. सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) बाल विवाहाची घटना समोर आली आहे. लग्नानंतर पुण्यात स्थायिक झालेल्या या मुलीची पुण्यातील एका रुग्णालयात प्रसुती झाली असता मृत बाळ जन्माला (Stillborn Baby) आले होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह माण तालुक्यातील देवापूर येथील समाधान चव्हाण याच्याशी 28 एप्रिल 2021 रोजी झाला होता. मुलीची आई आणि वडील यांनी मुलगी अल्पवयीन असतानाही समाधान चव्हाण याच्याशी लग्न लावून दिले होते.
पुण्यात स्थायिक मुलीची प्रसुती
लग्नानंतर मुलगी आणि तिचा पती पुणे येथे राहण्यास गेले होते. लग्न झाल्यानंतर अल्पवयीन असतानाही समाधान याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली होती.
कुटुंबातील पाच जणांविरोधात गुन्हा
दरम्यान तिची पुणे येथील रुग्णालयात प्रसुती झाली असता मृत बाळ जन्माला आले होते. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी मुलीचे आई-वडील, पती, सासू सासरे यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. यानंतर याबाबतचा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
संबंधित बातम्या :
नागपूर जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळला; कोरोनामुळं बालविवाह वाढताहेत?
म्हणे सोहळा वास्तुशांतीचा, डाव मांडला अल्पवयीनांचा, औरंगाबादेत पोलिसांची मोठी कारवाई!