Satara Murder | चारित्र्याच्या संशयातून बायकोला पेटवलं, महाबळेश्वरमधील पतीला जन्मठेपेची शिक्षा
राजू शिंदे याचे आपली पत्नी सुनिता शिंदे हिच्यासोबत 9 जानेवारी 2017 रोजी घरगुती कारणावरुन किरकोळ भांडण झाले होते. या वादातून त्याने बायकोला पेटवून दिले होते.
सातारा : चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला पेटवणाऱ्या महाबळेश्वर येथील पतीला अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सातारा जिल्हा न्यायालयाकडून आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी घरगुती वादातून नवऱ्याने बायकोला पेटवलं होतं. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले होते.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील रहिवासी असलेला आरोपी राजू गणपत शिंदे याला कोर्टाने शिक्षा सुनावली. राजू शिंदे याचे आपली पत्नी सुनिता शिंदे हिच्यासोबत 9 जानेवारी 2017 रोजी घरगुती कारणावरुन किरकोळ भांडण झाले होते. या वादातून त्याने बायकोला पेटवून दिले होते.
महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
या हल्ल्यात पत्नी सुनिता शिंदे 90 टक्के भाजल्या होत्या. त्यांना तात्काळ सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पत्नीचा खून केल्याचा गुन्हा
दरम्यान, आरोपी राजू शिंदे याच्यावर पत्नीचा खून केल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात 302 कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सातारा जिल्हा न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती मंगला धोटे यांच्या कोर्टात सहाय्यक सरकारी वकील आशीर्वाद कुलकर्णी यांनी सरकारची बाजू मांडली.
आरोपी पतीला जन्मठेप
एकूण पाच साक्षीदार, तसेच मयत महिलेने मृत्यूपूर्व दिलेला जबाब या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा ठरला. हे सर्व पुरावे कोर्टात सादर करुन युक्तिवाद करण्यात आला. यामध्ये जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालात आरोपी राजू गणपत शिंदे याला 302 कलमान्वये जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
बुलढाण्यात खाकीला कलंक, पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, दोघा पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल
अपहरण नव्हे हा तर खून, मुलगी नको म्हणून आईनेच काटा काढला, लेकीची पाण्यात बुडवून हत्या
पतीची हत्या करुन मृतदेह शेतात जाळला, हिंगोलीत पत्नीसह दोन मुलं जेरबंद