आईचा खून करुन मृतदेह झुडपात टाकला, बार्शीचा नराधम मुलगा रत्नागिरीत कसा सापडला?
बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथील शिंदे यांच्या घरी फावडे मायलेक राहत होते. त्यांच्या घराच्या कपाऊंडमध्ये एका प्लास्टिक कागदामध्ये महिलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सोलापूर : आईचा खून करुन फरार झालेला मुलगा अखेर गजाआड झाला आहे. श्रीराम नागनाथ फावडे याला बार्शी पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेतले. बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथे चार दिवसांपूर्वी श्रीरामने जन्मदात्या आईचा खून केला होता. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत उघडकीस आली आहे.
रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 वर्ष, रा. वाणी प्लॉट, बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21 वर्ष) असं आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. रात्री झोपेत असताना आईच्या डोक्यात दगड घालून श्रीराम फावडेने आईचा खून केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेह गादीसकट बाहेर ओढत आणून झुडपात टाकून तो पसार झाला होता.
प्लास्टिक कागदामध्ये महिलेचा मृतदेह
बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथील शिंदे यांच्या घरी फावडे मायलेक राहत होते. त्यांच्या घराच्या कपाऊंडमध्ये एका प्लास्टिक कागदामध्ये महिलेचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
मायलेकाचे वाद
मयत महिला रुक्मिणी आणि तिचा मोठा मुलगा श्रीराम फावडे हे दोघे जण तिथे राहत होते. लहान मुलगा आणि पती हे नेहमी भांडण होत असल्याने बार्शी शहरातील डंबरे गल्ली येथे वेगळे राहत होते. मोठा मुलगा आणि रुक्मिणी यांच्यात पैशावरुन नेहमी वाद होत होते. त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रारीही दाखल होत्या.
मुलगा मुंबईला गेल्याची माहिती
मयत महिलेचे पती नागनाथ फावडे आणि त्यांचा लहान मुलगा लक्ष्मण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेस्टसवरुन समजले, असे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व वापरते कपडे त्याने नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यापूर्वीही त्याने आई आणि धाकट्या भावाला मारहाण केल्याने रुक्मिणी फावडेंची हत्या मोठा मुलगा श्रीराम फावडे यानेच डोक्यात दगड घालून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
संबंधित बातम्या :
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उस्मानाबादेत महिलेचा मृत्यू, नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
पिंपरीतील कुख्यात रावण टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या, साताऱ्यातून सहा जणांना बेड्या
पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणाच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, नाशकात पाच जण अटकेत