पहाटे पाच वाजता पोलिसांची शेतात धाड, साडेआठ लाखांची 40 हजार लिटर हातभट्टी दारु नष्ट
सोलापुरातील सेवालाल नगर आणि बक्षी हिप्परगा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांना रिमझिम पाऊस आणि दलदल असलेल्या भागांचा सामना करावा लागला.
सोलापूर : काटेरी झुडूप आणि दाट गवत असलेल्या शेतात लपवून ठेवलेली 8 लाख 40 हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारु उद्ध्वस्त करण्यात आली आहे. प्लास्टिकच्या 190, तर लोखंडाच्या 11 बॅरलमध्ये भरलेलं 40 हजार लिटर गूळ मिश्रित रसायन नष्ट करुन हातभट्ट्या उद्ध्वस्त करणारी मोठी कारवाई सोलापूर जिल्हा तालुका पोलिसांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
सोलापुरातील सेवालाल नगर आणि बक्षी हिप्परगा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांना रिमझिम पाऊस आणि दलदल असलेल्या भागांचा सामना करावा लागला. सेवालाल नगर आणि बक्षी हिप्परगा परिसरात मोठ्या प्रमाणात हातभट्टी व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अरुण घुगे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ही कारवाई बक्षी हिप्परगा येथे पहाटे पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी अचानक धाड टाकून भरलेले बॅरल नष्ट केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास सेवालाल नगर येथे कारवाई करून हातभट्टी दारूचे बॅरल नष्ट करण्यात आले.
दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल
सेवालाल नगर आणि बक्षी हिप्परगा या ठिकाणी अवैध दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या ठिकाणी एकूण दहा जणांविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये एकूण दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सेवालाल नगर येथील या गुन्ह्यात बाबू लालू वडजे, विनोद बंडू राठोड, शिवाजी रामजी वडजे, काशिनाथ रामजी वडजे तर बक्षी हिप्परगा येथील गुन्ह्यात श्रीमंत मारुती सलगर, शिवाजी सोपान निकम, भारत नवनाथ माने, भगवान देविदास निकम, शिवाजी रामा पवार आणि शिवाजी राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये दारु विक्री सोडून चहाचे हॉटेल
दुसरीकडे, अहमदनगरमधील कर्जतच्या पोलीस निरीक्षकामुळे एका दारु विक्रेत्याचे मन परिवर्तन झाले. त्यामुळे त्याने दारु विक्री सोडून चक्क चहाचे हॉटेल सुरु केले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही किमया केली. कर्जत शहरातील बाळासाहेब माने हे अवैध दारु विक्री करत होते. ‘तुम्ही अवैध धंदे करू नका’ अशी समज वेळोवेळी पोलिसांनी त्यांना दिली. चांगला सन्मानजनक व्यवसाय करा, मी आवश्यकतेनुसार तुम्हाला मदत करेन, असे आश्वासन यादवांनी दिल्याने मानेंनी दारु विक्रीचा व्यवसाय सोडून चहाचे हॉटेल उघडले.
रक्षाबंधनाला बहिणींकडून भावाचा दारुचा गुत्ता उद्ध्वस्त
दरम्यान, गावातील अवैध दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुलेही दारूच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दोघी बहिणींनी गावातील अवैध दारू बंद करायची, असा निश्चय केला. दोन्ही बहिणींनी एकत्र येऊन भाऊ प्रकाश चव्हाण यांचा दारुचा अड्डा उद्ध्वस्त केला. गेल्या वर्षी बुलडाण्यात ही घटना समोर आली होती.
संबंधित बातम्या :
पोलीस निरीक्षकामुळे अवैध दारु विक्रेत्याचे हृदय परिवर्तन, मद्यविक्री सोडून चहाचं हॉटेल सुरु