दाढ काढल्यानंतर 25 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर चुकीच्या उपचारांचा आरोप
दाढेच्या ठिकाणी भूल देऊन दाढ काढण्यात आली. त्यानंतर रुग्ण महिलेस अशक्तपणा जाणवू लागला. काही वेळेतच उलटी झाली आणि नंतर ही महिला बेशुद्ध झाली, असा दावा तिच्या पतीने केला आहे
पंढरपूर : दाताच्या दवाखान्यात दाढ काढताना चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्याने महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात हा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील जयश्री नंदकुमार चव्हाण (वय 25 वर्ष) यांची दाढ दुखत होती. त्या पंढरपूर येथील दातांच्या दवाखान्यात दाढ काढण्यासाठी काल गेल्या होत्या. दाढ काढल्यानंतर त्यांना त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.
मयत महिलेच्या पतीचा दावा काय?
या प्रकरणी मयत महिलेचे पती नंदकुमार भागवत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार ते बुधवारी सायंकाळी पंढरपूर येथील एका दवाखान्यात दाढ काढण्यासाठी आले होते. दाढेच्या ठिकाणी भूल देऊन दाढ काढण्यात आली. त्यानंतर रुग्ण महिलेस अशक्तपणा जाणवू लागला. काही वेळेतच उलटी झाली आणि नंतर ही महिला बेशुद्ध झाली.
उपचाराला जाताना मृत्यू
त्यानंतर त्यांना सोलापूर येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. सोलापूरला उपचारासाठी जात असताना जयश्री चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला. हा मृत्यू दातांच्या डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे झाला असल्याचा आरोप मयत महिलेचे पती नंदकुमार चव्हाण यांनी केला आहे.
सखोल चौकशीची मागणी
मयत महिलेचा मृतदेह घेऊन नातेवाईक पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी डॉक्टरविरोधात आपली तक्रार असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे जयश्री चव्हाण यांचा मृत्यू झाला असून या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणीही नातेवाईक करत आहेत.
संबंधित बातम्या :
अपात्र MBBS डॉक्टरकडून मूळव्याधीच्या एक हजार शस्त्रक्रिया, दादरमधून अटक
सेट टॉप बॉक्स रिचार्जच्या कारणाने घरात प्रवेश, डेंटिस्ट महिलेची राहत्या घरी हत्या