PUNE CRIME NEWS : पायाला ठेच लागली थेट दरीत पडला, मित्रांनी धावपळ केली, पण…
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ज्या ठिकाणी पाऊस चांगला झाला आहे, अशा ठिकाणी रानभाज्या आल्या आहेत. एक तरुण रानभाज्या तोडत असताना दरीत पडला आहे.
पुणे, 17 जुलै 2023 : महाराष्ट्रात (Maharashtra News) सगळीकडं डोंगर नटलेले दिसत आहेत. गवताला फुट फुटायला सुरुवात झाली आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर हे हिरवगार डोंगर (pune bhimashankar news) पाहण्यासारखे असतात. काही तरुण या दिवसात अनेक ठिकाणी पर्यटनाला जातात. या दिवसात अनेकदा माळरानावर रानभाज्या सुध्दा येतात. काल पुण्याच्या भीमाशंकरच्या जंगलात (bhimashankar forest) रानभाज्या काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा कड्यावरून पडून मृत्यु झाला आहे. अजय शशिकांत कराळे वय 23 असे या युवकाचे नाव आहे. ज्यावेळी त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती त्या परिसरात समजली, त्यावेळी संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी नेमकं काय झालं हे सुध्दा सांगितलं.
अजय कराळे,अक्षय कराळे व संतोष चपटे असे तीन मित्र काल त्याच्या गावाला लागून असलेल्या डोंगरावरती गेले होते. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपासून डोंगरामध्ये चाव्याचे कोंब व कोळूची भाजी डोंगरात दिसू लागली आहे. भीमाशंकर परिसरात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.
अधिक पाऊस झाल्यामुळे डोंगरवाटा निसरड्या झाल्या आहेत. तिथल्या एका निसरड्या जागी अजयला ठेच लागली आणि तो दरीत कोसळला, 25 ते 30 फूट खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला होता, त्याचबरोबर त्याचा हात फॅक्चर झाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. अजयच्या डोक्याला अधिक मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अजय कराळेचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
भीमाशंकर अभयारण्यात ट्रेकिंगसाठी गेलेल्या पुण्यातील गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुसरी एक घटना काल घडली आहे. रमेश भगवान पाटील असं त्यांचं नाव आहे.