जितेंद्र पाटील, पालघर / 24 जुलै 2023 : जीव मारण्याची धमकी देऊन मोलमजुरीसाठी येणाऱ्या मोलकरणीवर मालकाने वारंवार अत्याचार केल्याची घटना डहाणूमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोलकरणीच्या फिर्यादीवरुन डहाणू पोलिसात कलम 376 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खोदादाद इराणी असे आरोपी मालकाचे नाव आहे. या घटनांमुळे मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी मजुर महिलांनी केली आहे.
पीडित महिला आपल्या कुटुंबातील काही महिलांसह आरोपीच्या वाडीत चिकू तोडण्यासाठी आणि घरकाम करण्यासाठी जात होती. एक दिवस महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. यानंतर जीवे मारण्याची घेत आणि दमदाटी करत पाच महिने महिलेवर अत्याचार करत होता. अखेर आरोपीच्या अत्याचाराला कंटाळेल्या महिलेने डहाणू पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार कथन केला. यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
डहाणूत घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. डहाणू, घोलवड, बोर्डी सारख्या परिसरात असलेल्या शेकडो चिकूवाड्यांमध्ये काम करणाऱ्या आदिवासी महिला मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या महिला मजुरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.