नवी दिल्ली : नोकरीवरुन काढल्याचा राग मनात धरुन तिहेरी हत्याकांड केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पश्चिम दिल्लीतील अशोक नगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सचिन आणि सुजित अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपीसह अन्य आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.
समीर आहुजा, शालू आहुजा आणि सपना अशी मयत तिघांची नावे आहेत. तिघांचीही चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. समीर आहुजा आणि शालू आहुजा या पती-पत्नीची हत्या करुन आरोपी घरात होते. तितक्यात मोलकरीण सपना तेथे पोहचली. आरोपींनी तिलाही संपवले.
शालू आहुजा ब्युटी पार्लर होते. दहा दिवसांपूर्वी शालूने मुख्य आरोपी आणि त्याच्या मैत्रिणीला नोकरीवरुन काढून टाकले होते. तसेच दोघांसोबत गैरवर्तन केले. याचाच राग मनात धरुन आरोपींनी आपल्या साथीदारांसह हे हत्याकांड केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्याकांडात 4 ते 5 आरोपींचा समावेश असून दोघांना अटक केली आहे. अन्य फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस म्हणाले.
चार मजली घराच्या तळमजल्यावर पार्किंगमध्ये शालू आणि सपना यांचा मृतदेह आढळला, तर समीरचा मृतदेह वरच्या मजल्यावर होता. हत्या केल्यानंतर आरोपींनी लॅपटॉप, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरले.
पोलिसांनी अटक आरोपींकडून आयफोन 13, गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि रक्ताने माखलेला टॉवेल जप्त केला आहे.
मंगळवारी सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना चोरी झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र पोलीस जेव्हा घटनास्थळी दाखल झाले तेव्हा घटनास्थळी पोलिसांना तीन मृतदेह आढळले. एक वर्षापूर्वीच हे कुटुंब विकासपुरीतून या भागात रहायला आले होते.
घटना घडली तेव्हा दाम्पत्याची तीन वर्षाची मुलगी दुसऱ्या खोलीत झोपली होती. सुदैवाने मुलगी सुखरुप आहे.
आरोपी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दोन बाईकवरुन आरोपी आल्याचे आणि हत्या करुन ते 9 वाजण्याच्या सुमारास निघताना दिसत आहेत.