हळदीसाठी निघाले ते परतलेच नाहीत, एका दिवसात 9 ठार, बुलढाणा आणि सांगलीत भीषण अपघात
राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या दोन अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल एका दिवसात झालेल्या अपघातात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा, सांगली आणि नगरमध्ये हे अपघात घडले. या अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अपघाताचे कारण शोधत आहेत.
राज्यात गेल्या एका दिवसात दोन भीषण अपघात झाले आहेत. बुलढाण्यात हळदीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात देशमुख कुटुंबातील चारजण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात काल झाला. तर कालच सांगलीत झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. दोन दिवसात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही अपघातांचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. मृतदेह ताब्यात घेतले असून त्याचे शवविच्छेदन केले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील देशमुख कुटुंब काल संध्याकाळी जालन्याला हळदीच्या कार्यक्रमाला जात होते. नवरीला हळद लावण्यासाठी जात असताना देशमुख कुटुंबाची स्कॉर्पिओ उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात चारजण जागीच ठार झाले. खामगाव ते जालना महामार्गावरील देऊळगावराजा दरम्यान दगडवाडी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात विलास देशमुख, अशोक नयाके, वसंत देशमुख, योगेश देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातातील गंभीर जखमींना देऊळगावराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल दाखळ करण्यात आले आहे. अपघातातील मयत अंबाशी गावचे रहिवाशी होते. एकाच गावातील चारजणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात वाहनचालकाचाही मृत्यू झाला.
अपघाताचं नेमकं कारण काय?
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पंचनाम्यासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम पोलीस करत आहेत.
सांगलीत पाच ठार
दरम्यान, सांगलीतील जत मार्गावरील नागज जवळील जांभूळवाडी हद्दीत क्रुझर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. काल झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी आहेत. या क्रुझरमधून 15 जण प्रवास करत होते अशी माहिती मिळतेय. सर्व जखमींना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रुझरमधील सर्वजण तासगाव तालुक्यातील सावर्डेकडे लग्न सोहळ्याला जात असताना हा अपघात झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पालखी यात्रेतील महिलांना धडक
तर, नगरमध्ये मंगळवारी भीषण अपघात झाला. सिन्नर – शिर्डी महामार्गावर चांदेकसारे शिवारात हा अपघात झाला. पायी चालत असलेल्या साई पालखीतील 3 ते 4 महिला भाविकांना दुचाकीस्वाराने धडक दिली. या धडकेत एक महिला ठार झाली तर दोन महिला जखमी झाल्या. चांदकेसार परिसरातील हॉटेल साई मुकुंदाजवळ हा भीषण अपघात झाला. जखमींना शिर्डीच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव अनिता दशरथ दवंगे आहे. ही महिला पाथरे येथील राहणारी आहे. तर जखमी महिलांची नावे कांता दिलीप चिने आणि सरला गणपत दवंगे अशी आहेत. या महिला राम नवमी निमित्ताने पाथरे ते शिर्डीकडे निघालेल्या श्रीराम मित्र मंडळाच्या पालखीतून पदयात्रा करत होत्या. तेव्हा हा अपघात झाला.