पडक्या घरात अघोरी प्रयोग, गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी, जालना पोलिसांनी जादूटोण्याचा खेळ उधळला
जालना जिल्ह्यात जादूटोण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने एका नराधमाने मांत्रिक महिलेच्या मदतीने आपल्या पत्नीचाच नरबळी देण्याचा प्रयत्न केला.
जालना : जालना जिल्ह्यात जादूटोण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने एका नराधमाने मांत्रिक महिलेच्या मदतीने आपल्या पत्नीचाच नरबळी देण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने तिचे प्राण वाचले. पोलिसांनी महिलेची बाजू ऐकून घेतली. तिच्या तक्रारीची नोंद घेत ती सांगत असलेल्या घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर महिला सांगत असलेल्या गोष्टी खऱ्या असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीसह तिचा मित्र आणि एका महिला मांत्रिकाला बेड्या ठोकल्या.
संबंधित घटना ही जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या डोणगाव येथील आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा पती संतोष पिंगळे, त्याचा साथीदार जीवन पिंगळे यांच्यासह एका महिला मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर या प्रकराची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर तालुक्यातही या विषयावर चर्चा होऊ लागली आहे.
पोलिसांनी तपास कसा केला?
पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जावून सर्व प्रकरणाची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. पोलीस गावातील पडक्या घरातही गेले. तिथे तपास केला असता घरात पुजेचे काही साहित्य सापडले. ते पाहून पीडिता खरं सांगत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी नंतर पीडितेच्या पतीसह आणखी दोघांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणी आरोपींविरोधात नरबळी, अनिष्ट आणि अघोरी अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
साताऱ्यात स्मशानभूमीत अल्पवयीन मुलगी पुजण्याचा अघोरी प्रकाऱ
दुसरीकडे सातारा जिल्ह्यात देखील असाच काहिसा प्रकार समोर आला आहे. साताऱ्यात अल्पवयीन मुलीला स्मशान भूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील सुरुरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीच्या कट्ट्यावर बसवून तिच्या मांडीवर कोंबडा ठेवण्यात आला होता. मांत्रिकाने पूजन करतानाचा हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी, नातेवाईक परागंदा झाले. चक्क स्मशान भूमीत अशा प्रकारे अल्पवयीन मुलीचे पूजन केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीत ही घटना घडली.
चंद्रपुरात जादूटोण्याच्या संशयातून मारहाण
दुसरीकडे, जादूटोणा केल्याचा आरोप करत 49 वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ आणि हातबुक्कीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात चंद्रपूरमध्ये जादूटोण्याच्या संशयातून मारहाण होण्याची तिसरी घटना उघडकीस आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील मोहाडी गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 49 वर्षीय पीडित व्यक्ती काल संध्याकाळी आपल्या घरी असताना याच गावातील विकास गजभे (19) घरी आला. तू माझ्या मोठ्या भावावर जादू केली आहेस, असं म्हणत त्याने शिवीगाळ आणि हातबुक्कीने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी विकास गजभे याला अटक केली आहे.
हेही वाचा :
जादूटोणा केल्याच्या संशयातून शिवीगाळ-मारहाण, चंद्रपुरात महिन्याभरातील तिसरी घटना
VIDEO : जादूटोण्याचा संशय, सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांसह 7 जणांना खांबाला बांधून मारहाण