आधी मॅट्रीमोनिअल साइटवरून ओळख वाढवली, मग भेटायलाही बोलावले अन् बंदूकीच्या धाकावर …
आरोपी भामटा मॅट्रीमोनिअल साइटवरून ओळख वाढवून महिलांना भेटायला बोलवायचा. मात्र त्या आल्यानंतर तो बंदुकीच्या धाकावर...
नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : विवाहोच्छुक तरूणींना मॅट्रीमोनिअल वेबसाईटवरून (matrimonial websites) कॉन्टॅक्ट करून, त्यांना भेटायला बोलावणाऱ्या आणि त्यानंतर बंदूकीचा धाक दाखवून त्यांना लुटणाऱ्या (robbing woman) 30 वर्षांच्या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हसन खान असे या आरोपीचे नाव असून, तो निहाल विहार येथील रहिवासी आहे. आरोपी खान हा एका व्यक्तीला भेटणार असून नवीन गुन्हा करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती 11 ऑगस्ट रोजी पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार, पोलिसांनी खान याला पकडण्यासाठी रोहिणीच्या दिशेने यू-टर्नजवळ सापळा रचला. रात्री 11.40 च्या सुमारास खान तेथे पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खानने त्याच्याकडील पिस्तुल काढत पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला आणि खानला अटक केली.
स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (खान) हा हेल्थ सप्लीमेंट्सचा (small-scale) पुरवठादार असून तो फायनॅन्स मध्ये एमबीए देखील करत आहे. त्याच्या वडीलांना कॅन्सर झाला असून त्याची आई गृहिणी आहे, असेही त्यांनी सांगितले. खान याचे आधी लग्न झाले होते, मात्र नंतर त्याचा घटस्फोट झाला असून त्याल 7 वर्षांचा एक मुलगाही आहे.
केली अनेक महिलांची फसवणूक
सध्याच्या प्रकरणात, आरोपीने ‘रियासत खान’ हे बनावट नाव वापरून मॅट्रीमोनिअल वेबसाईटद्वारे 29 वर्षांच्या पीडित महिलेशी संपर्क साधला होता, असे पोलिसांनी सांगितले. “6 ऑगस्ट रोजी, त्याने तिच्याशी व्हॉट्सॲप वरून चॅटिंग करत मीटिंग फिक्स केली आणि तिला रोहिणीतील सेक्टर 21 येथील पार्कजवळ भेटण्यास सांगितले. लग्नासंदर्बात पुढील चर्चा करण्यासाठी तिला कारमध्ये बसवले. मात्र ती गाडीत बसताच त्याने पिस्तुल काढले आणि जराही आवाज केल्यास मारण्याची धमकी दिली. बंदुकीचा धाक दाखवत त्याने तिचे अपहरण करत कांजवला रोड मार्गे तिला नांगलोई येथे नेले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तेथे गेल्यावर त्याने तिच्याकडील मोबाईल, कानातले, सोन्याच्या चार अंगठ्या आणि स्मार्ट वॉच हिसकावून घेतले आणि नांगलोई येथे सुनसान रस्त्यावर सोडून दिले. याच पद्धतीने खान याने यापूर्वीही अनेक महिलांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी नमूद केले.