माझ्याशी अश्लील चॅट करा नाही तर… AI द्वारे बायकोच्या मैत्रिणीचे अश्लील फोटो बनवले आणि…
काही लोक तंत्रज्ञानाचा गैरवापर करतात. एखाद्याची फसवणूक करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी हा वापर करतात. त्यामुळे मोठा अनर्थ ओढवतो. गुन्हा घडतो आणि रवानगी थेट तुरुंगात होते.
नवनवं तंत्रज्ञान निर्माण होत असतं. त्या तंत्रज्ञानाचा फायदा ही होतो आणि नुकसानही होत असतं. काही लोक या तंत्रज्ञानाचा अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी उपयोग करतात. कामाचा भार कमी व्हावा म्हणून उपयोग करतात. तर काही लोक तंत्रज्ञानाचा गैरवापर करतात. एखाद्याची फसवणूक करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी हा वापर करतात. त्यामुळे मोठा अनर्थ ओढवतो. गुन्हा घडतो आणि रवानगी थेट तुरुंगात होते. मध्यप्रदेशातही तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचा धक्कादायका प्रकार उघड झाला आहे. AIच्या माध्यमातून स्त्रियांचे अश्लील फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
आरोपी नगर पालिकेत कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. पीडित महिलांमधील सर्वाधिक महिला या त्याच्या बायकोच्या मैत्रीणी आहेत. यश भावसार असं या आरोपीचं नाव आहे. तो मध्यप्रदेशातील शाजापूर नगर परिषदेत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याने एआयचा वापर करून या महिलांचा डिपफेक फोटो तयार केला. ज्या महिलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे, अशा महिलांनाच त्याने टार्गेट केलं. त्यानेही स्वत:चं एक बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं होतं. त्यानंतर तो या महिलांना हे अश्लील फोटो पाठवत होता. तसेच माझ्याशी अश्लील चॅट करा नाही तर तुमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी तो द्यायचा.
जर मला ब्लॉक केलं तर तुमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकीही त्याने दिली होती. एका महिलेशी तर तो अश्लील चॅटही करण्याचा प्रयत्न करत होता. तिने नकार दिल्यावर तिला बदनाम करण्यास त्याने सुरुवात केली होती. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कॉलेजच्या पोरींची शिकार
या पीडितांपैकी कॉलेज तरुणी अधिक आहेत. त्यातील अनेकजणी तर यश भावसारच्या बायकोच्या मैत्रिणी आहेत. तो या मुलींना आधीपासूनच ओळखायचा. त्यांच्यावर त्याची वाईट नजर पहिल्यापासून होती. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आरोपीने अजूनही अधिक गुन्हे केले की नाही याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती डीसीपीने दिली.
ब्लॅकमेलिंगच्या अनेक घटना
यापूर्वीही डीपफेक फोटोद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याच्या असंख्य घटना समोर आल्या आहेत. एप्रिल 2024मध्ये उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमध्ये एआयच्या मदतीने ब्लॅकेमेलिंग केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. लोनिंग अॅपचा वापर करून हा प्रकार करण्यात आला होता. सायबर ठगांनी लोनच्या नावाने वसूल करतानाच एआयएच्या मदतीने पीडिताच्या मुलांचे अश्लील फोटो बनवले होते. त्यानंतर हजारो रुपयांसाठी ब्लॅकमेलिंग सुरू केली होती.
महिला आणि मुलं होताहेत शिकार
एआयचा चुकीचा वापर केला जात आहे. न्यूड फोटो आणि व्हिडीओ बनवणारे नेहमी लहान मुले आणि महिलांची शिकार करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, व्हिडीओ तयार करण्यासाठी अनेक अँगलच्या फोटोंची आवश्यकता असते. पण असे फोटो बनवण्यासाठी एका फोटोची गरज पुरेशी असते. सोशल मीडियातून फोटो चोरणं हा सर्वात सोपा उपाय झाला आहे. डीपफेक न्यूड फोटो बनवून लहान मुले आणि महिलांनाच अधिक टार्गेट केलं जात आहे.