धक्कादायक ! पत्नीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी त्याने शेजाऱ्यांच्या मुलींसोबत जे केलं ते ऐकून…
चॉकलेटमधून विषबाधा झाल्याने लहान मुलगी आजारी पडली आणि तिचा मृत्यू झाला. विषारी टॉफीमुळे आत्तापर्यंत तीन मुलींनी जीव गमावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या इसमाला अटक केली आहे.
लखनऊ | 21ऑगस्ट 2023 : विषारी टॉफी खाल्ल्यामुळे आजारी पडलेल्या आणखी एका मुलीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी टॉफी (poisionus chocolate) खाल्ल्याने आतापर्यंत तीन मुलींचा मृत्यू झाला आहे, तर आणखी एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. टेरेसवर झोपायला गेलेल्या मुलींना विषारी टॉफी देण्यात आली होती. चौघींनी त्या टॉफी खाताच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यामध्ये तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मात्र हे कृत्य जाणूनबुजून करण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आपल्या दोन पत्नींच्या आत्महत्येनंतर बदला घेण्यासाठी लहान मुलींचा बळी दिल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात येथे ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशंबी जिल्ह्यातील कडा धाम पोलीस स्टेशन हद्दीतील सौराई बुजुर्ग गावात वासुदेव प्रजापती यांच्या दोन मुली साधना (सात वर्ष) आणि शालिनी (चार वर्ष) घराच्या छतावर झोपल्या होत्या. प्रजापती यांचा शेजारी शिव शंकर याने रात्रीच्या वेळी मुलींच्या बेडजवळ विषारी टॉफी फेकल्या, त्या टॉफी साधना आणि शालिनी यांनी उचलल्या. त्यानंतर त्यांनी त्या टॉफीज , वर्षा (सात वर्ष) आणि आरुषी (चार वर्ष) या त्यांच्या चुलतबहिणींसोबतही शेअर केल्या व चौघींनी त्या टॉफीज खाल्ल्या.
चॉकलेट खाताच बिघडली तब्येत
त्या टॉफीज खाताच चौघींचीही तब्येत बिघडू लागली, त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे त्यांना बर न वाटल्याने डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी चौघींनाही जिल्हा रुग्णालयातून गंभीर अवस्थेत प्रयागराज येथील सरोजिनी नायडू चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यान साधना आणि शालिनी यांचा मृत्यू झाला.
चौथ्या मुलीची तब्येत नाजूक
तर रविवारी सकाळी तिसरी मुलगी, वर्षा हिचा देखील मृत्यू झाला. दरम्यान चौथी मुलगी आरुषी हिच्यावर अद्याप उपचार सुरू असले तरीही तिची तब्येतही अजून नाजूक आहे. मुलींजवळ विषारी टॉफी फेकल्याप्रकरणी आरोपी शिव शंकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे
त्याने असं का केलं ?
आरोपी शिवशंकर (३७) याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, वर्षभरापूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर दुसऱ्या पत्नीनेही दोन महिन्यांपूर्वी विष प्राशन करून आयुष्य संपवलं होतं. त्यानंतर आजूबाजूचे लोक त्याच्यावर टीका करायचे, त्याला टोमण मारायचे. त्यामुळे सूडाच्या भावनेने त्याने हे कृत्य करत त्या निष्पाप मुलींचं आयुष्य संपवलं.